जत : जत तालुका दुष्काळात होरपळत असताना शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर जत भाजप व मित्र पक्षाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर देत सोमवारी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जत शहरातील महाराणा प्रताप चौकात रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.मागण्याबाबत जिल्ह्यातील अधिकारी ठोस निर्णय देत नाही तोपर्यत हा रास्तारोको मागे घेणार नसल्याची माहिती माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या जत तालुक्यात पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे जत तालुका
दुष्काळ जाहीर करावा, म्हैसाळचे आवर्तन सुरू करावे, विस्तारित म्हैसाळ योजनेचे संपूर्ण टेंडर काढून काम सुरू करावे, जनावरांसाठी चारा डेपो, चारा छावणी सुरू करावी,या मागण्या करण्यात आल्या आहेत.सदरच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा सोमवारी जत शहरातील महाराणा प्रताप चौकात माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील नागरिक,शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे,रामाण्णा जिव्वणावर,संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.