जत : राज्यभरात पावसामुळे समाधान व्यक्त होत आहे. काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, आजही जत तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय, अनेक गावांना पिण्यासाठी आधार असणारे २७ पैकी १९ तलाव कोरडे पडले आहेत. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आजही ऐन पावसाळ्यात जत तालुका कोरडाच आहे.तालुक्यातील १६ गावांत पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने या ठिकाणी १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय, चार गावांचा पाण्याचे टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे आला असून,टँकर मागणीची शक्यता निर्माण झाली आहे. तिकोंडी, उमराणी, डफळापूर,काराजनगी या गावांचा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकड़े आला आहे.सध्या निगडी खुर्द, शेडयाळ,सिंदूर, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी,हळ्ळी, सालेगिरी, पाच्छापूर, वायफळ,सोन्याळ, कुडनूर, गुगवाड, संख,गिरगाव, जाडरबोबलाद या गावांना आणि त्याखालील वाड्यावस्त्यांवर १८ टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू आहे.
तालुक्यात मान्सूनपुर्व पावसाने प्रतिवर्षी पेरणीला सुरूवात होते.जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागतो मात्र यंदा राज्यात पावसाचे उशिरा आगमन झाले. सांगली जिल्ह्यात तर पूर्वेला दुष्काळ आणि पश्चिमेला सुकाळ असा निसर्गाचा विरोधाभास पाहायला मिळतोय.एकीकडे शिराळा तालुक्यातील चांदोली धरण ८२ टक्के पाण्याने भरलेले आहे तर दुसरीकडे जत तालुक्यातील एका मध्यम प्रकल्पासह १८ तलाव कोरडे ठणठणीत आहेत.सध्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे
पाणी सोडण्यात आले आहे.यातून पश्चिम भागातील सात ते आठ तलाव भरले जातील.मात्र पूर्व भागात पाण्यासाठी वणवण करावी लागणार हे निश्चित आहे. महत्त्वाचे म्हणजे अभावी जनावरांवरही उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिथे आपले पोट भरत नाही तिथे जनावारांच्या पोटाची सोय कोठून करायची या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.त्यामुळे अनेक गावांत शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची परिस्थिती ओढवली आहे.अनेक गावांत या आधीच्या भारत निर्माण योजना, राष्ट्रीय पेयजल योजना व सध्याच्या जलजीवन अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावांत नळपाणीपुरवठा देण्याचे उद्दिष्ट आहे.मात्र जत तालुक्यातील पंचवीस ते तीस टक्के योजना पाण्याअभावी बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्चूनही गावगाड्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.