प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

0
2

 

सांगली : शासनाने खरीप हंगाम 2023 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2023 अशी होती. या योजनेत आता सहभागी होण्यासाठी दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढीस मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी केवळ एक रूपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वतः शेतकऱ्यांनी तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजेंट, क्रॉप इंन्शुरन्स अँप व सामुहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त (कृषि) सुनील चव्हाण यांनी केले आहे.

 

ज्यामध्ये कोकण व विर्दभातील काही जिल्ह्यामध्ये जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, खंडीत वीज पुरवठा, खंडीत इंटरनेट सेवा, PMFBY पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार (UIDAI) व CSC सर्व्हरमधील व्यत्यय, राज्याच्या भूमी अभिलेख पोर्टलच्या तांत्रिक, सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढीस मान्यता दिली आहे. अधिक माहितीसाठी तात्काळ संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आयुक्त (कृषि) सुनील चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here