अंमली पदार्थांची वाढती तस्करी आणि ड्रग्जच्या आहारी जात असलेली तरुण पिढी हे संपूर्ण मानवजातीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीच्या बातम्या रोज वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर पाहायला व वाचायला मिळतात. अंमली पदार्थांचा हा व्यापार झपाट्याने वाढत असून त्यात तरुण पिढी बरबाद होत आहे. नशा हे “नाश” चे दुसरे नाव आहे, जे माणसाच्या मेंदूला नियंत्रित करून त्याला संपूर्णतः उद्ध्वस्त करते. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक अशा प्रत्येक प्रकारे नशा माणसाला पोकळ बनवते. व्यसनामुळे रोग, ताण, शारीरिक असंतुलन, गोंधळ, द्वेष, क्रोध यांसारख्या परिस्थितींमध्ये वाढ झाल्याने कुटुंबात कलह वाढतो. गुन्ह्यांमध्ये वाढ होण्यात नशा मोठी भूमिका बजावते, अर्ध्याहून अधिक गुन्हे हे नशेत किंवा नशेसाठी केले जातात. आजकाल गुन्हेगारी झपाट्याने वाढली असून अंमली पदार्थांचा अवैध व्यवसायही शिगेला पोहोचला आहे.
अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना समाजात तुच्छतेने पाहिले जाते, कुटुंबातील लोक आणि नातेवाईकही त्यांच्यापासून दूर पळतात. नशेत पैशाचा अपव्यय होत असल्याने समाजातील प्रतिष्ठाही झपाट्याने कमी होते. नशेत माणसाची विचारशक्ती कमकुवत होते. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले लोक अस्वस्थ राहतात, जीवनातील आनंद नाहीसा होऊ लागतो. लोकांकडून तिरस्कार होतो. काही वेळा तर कुटुंबातील सदस्य आणि शेजारी व्यसनाधीन लोकांना इतके कंटाळतात की ते त्यांच्या मृत्यूची इच्छा देखील करू लागतात. अंमली पदार्थांच्या व्यसनींना समाजात कोणीही चांगले मानत नाही. व्यसनाधीनांना कोणी कामावर ठेवू इच्छित नाही, कारण ते व्यवस्थित कामे करीत नाहीं परिणामी, आर्थिक अडचणींमुळे ते स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत. नशेच्या आहारी जाण्यासाठी व्यसनाधीन गुन्हे करण्यासही तयार असतात. त्यामुळे समाजात दारिद्र्य, नशा आणि गुन्हेगारीचे चक्र असेच सुरू असते.
“अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस” दरवर्षी २६ जून रोजी जगभरात जनजागृती करण्यासाठी पाळला जातो आणि अंमली पदार्थांपासून मुक्त जग साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आणि सहकार्याला बळकटी दिली जाते. अंमली पदार्थांचा वापर करणाऱ्या अनेक व्यसनींना कलंक आणि भेदभावाचा सामना करावा लागतो आणि परिणामी त्यांना योग्य उपचार, आधार मिळत नाही. या वर्षी २०२३ ची थीम आहे “लोक प्रथम: कलंक आणि भेदभाव थांबवा, प्रतिबंध मजबूत करा”. या वर्षीच्या मोहिमेचा उद्देश अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या लोकांशी आदर आणि सहानुभूतीने वागण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आहे; जेणे करून त्या व्यसनींना आपल्या सर्वांच्या सहकार्याने नशामुक्त होऊन पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी मिळेल.
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने केलेल्या अभ्यासानुसार, देशातील किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखू आणि दारू ही सर्वात सामान्य व्यसनं आहेत, मग इनहेलेंट्स आणि भांग आहेत. तंबाखूचा वापर सुरू केलेले सरासरी वय १२ वर्षे दर्शविले, आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ४६% झोपडपट्टीत राहणाऱ्या किशोरवयीन मुलांनी अगदी लहान वयात धूम्रपान आणि तंबाखू, तसेच दारू आणि गांजा यांचा वापर सुरू केला होता. शहरांतील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा अनेक ग्रामीण भागात अगदी ६-७ वर्षे वयोगटातील मुलेही ज्वलनशील रसायने व अंमली पदार्थांचा उग्र वास घेतांना किंवा तंबाखू खाताना दिसतात. २०२२ मध्ये २६,६२९ किशोरवयीन मुलांनी अंमली पदार्थ सेवन केल्याची नोंद झाली आहे, जी २०१६ च्या तुलनेत ३००% वाढ दर्शवते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने केलेल्या राष्ट्रीय व्यापक सर्वेक्षणानुसार, देशात ६ कोटींहून अधिक ड्रग्ज वापरणारे आहेत. ज्यामध्ये मोठ्या संख्येने वापरकर्ते १०-१७ वयोगटातील आहेत.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटरने शालेय विद्यार्थ्यांमधील अंमली पदार्थांच्या गैरवापरावर केलेल्या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की, सर्वेक्षण केलेल्या १४ पैकी १ विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यात कोणत्यातरी अंमली पदार्थ वापरले होते. हे सर्वेक्षण मे २०१९-जून २०२० दरम्यान इयत्ता ८-१२ च्या सुमारे ६००० शालेय विद्यार्थ्यांवर करण्यात आले. सर्वेक्षणात असे आढळून आले की १०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मादक द्रव्यांचे सेवन (इनहेलेंट्स, कॅनॅबिस, ओपिओइड्सपासून ते अल्कोहोल आणि तंबाखूपर्यंत) केले होते. वर्षनिहाय विश्लेषणात असे दिसून आले की ४% तंबाखू वापरतात, त्यानंतर अल्कोहोल ३.८%, ओपिओइड्स २.८% (अफु, हेरॉइन आणि फार्मास्युटिकल ओपिओइड्स), कैनबिस (भांग, चरस आणि गांजा) २% आणि १.९% टक्के विद्यार्थ्यांनी इनहेलेंट्स चा नशा केला. इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्रीने मेटा-विश्लेषणात म्हटले आहे की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण १८% इतके जास्त आहे.
गेल्या आठ वर्षांत भारतात अंमली पदार्थांचा वापर ७० टक्क्यांनी वाढला असून, देशात सुमारे १०० दशलक्ष व्यसनी आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, भारतातील १३ टक्के ड्रग्ज व्यसनी हे २० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. देशाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने शेवटच्या अहवालात अंमली पदार्थांच्या अंदाजे वापराची आकडेवारी जाहीर केली आहे, त्यात असे दिसून आले की ३१ दशलक्ष गांजाचे वापरकर्ते होते, २४ दशलक्ष ओपिओइड वापरकर्ते आणि ७.७ दशलक्ष इनहेलर वापरत होते. २०४७ पर्यंत भारताला ‘अंमली पदार्थ मुक्त’ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
आजच्या आधुनिक युगात मुलं खूप सक्रिय आणि महत्त्वाकांक्षी दिसतात. मुलांना लवकरात लवकर स्वतंत्र आणि स्वावलंबी व्हायचे असते. आधुनिकता आणि इंटरनेटमुळे मुले खूप लवकर मोठी झालेली दिसतात. बहुतेक पालक असेही म्हणतात की त्यांची मुले खूप हुशार आणि होनहार आहेत. सर्व पालकांना त्यांच्या मुलांचा अभिमान आहे, ही चांगली गोष्ट आहे, परंतु आजच्या काळात पालकांनी मुलांच्या चांगल्या-वाईट सर्व कामांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुलांमध्ये नशेच्या वाढत्या प्रमाणाला सर्वात मोठे दोषी पालक आहेत, जर वेळीच मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सोयीस्कर संगोपण मिळाले असते तर इतकी वाईट परिस्थिती उद्भवली नसती. मुलांची दैनंदिन दिनचर्या, त्यांचे मित्र, वर्गमित्र, मुले कोणाला भेटतात, कुठे येतात-जातात, त्यांचा वेळ कुठे आणि किती घालवतात हे पालकांनी जाणून घेतले पाहिजे. मुलांचे पालकांशी खोटे बोलणे आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतण्याचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे. अंमली पदार्थांकडे वाटचाल करणारी तरुण पिढी समाजासाठी शाप ठरली आहे. या वयात मुलांना अधिक हाताळणीची आवश्यकता असते. पालकांचा व्यस्ततेचा बहाणा आणि मुलांवरचा त्यांचा आंधळा विश्वास मुलांच्या येणाऱ्या उज्वल भविष्याला उद्ध्वस्ततेकडे वळवतो.
मुलांना बोलण्यात किंवा वागण्यात कसलाही संकोच वाटू नये म्हणून पालकांनी मुलांना मित्रासारखे वागवावे. मुलांसोबत वेळ घालवावा, मुलांचे वर्तन त्यांच्या जिज्ञासा आणि स्वभावानुसार समजून घेणे, खोटा देखावा टाळावा, मुलांसोबत पालकांनी जीवनातील चांगल्या-वाईट गोष्टी, अनुभव शेअर करावें. मुलांसमोर कधीही अयोग्य वागू नका. पालकांनी मुलांसमोर नशा करणे ही लज्जास्पद बाब आहे. नशा कोणीही कधीही कोणत्याही वयात कधीच करू नये, नशेमुळे फक्त नुकसानच होते. आजची मुले ही उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत, आजची तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे, त्यांना अंमली पदार्थांपासून वाचवण्याची जबाबदारी पालकांची आहे. आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे हे पालकांचे परम कर्तव्य आहे. देश अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी पालकांबरोबरच शिक्षक, समाज आणि सरकारची जबाबदारीही खूप महत्त्वाची आहे. नशा मुक्त होऊन आनंदी आयुष्य जगूया आणि सशक्त देश घडवूया. जर तुम्ही किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य अमली पदार्थांच्या गैरवापराचा बळी असेल, तर तुम्ही भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या नशा मुक्त भारत अभियानाच्या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १४४४६ द्वारे मदत घेऊ शकता.
डॉ. प्रितम भि. गेडाम
मोबाईल आणि व्हॉट्सअॅप क्र. ०८२३७४ १७०४१