तासगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे व शिपाई दत्ता जगताप यांनी शासकीय कागदपत्रे, नकाशे खाजगी व्यक्तीच्या हातात दिली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी शिरढोणे व जगताप यांचे गाल रंगवले होते. याप्रकरणी प्रदीप माने यांच्यासह विशाल भोसले व सुनील घेवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील माने व भोसले यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
येथील प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची पिळवणूक होते. याठिकाणी एजंटांचा सुळसुळाट आहे. एजंटांकरवी शेतकऱ्यांची लुबाडणूक होते. याठिकाणी एजंटांचा हातात शासकीय दस्तऐवज दिले जातात, अशा तक्रारी होत्या. खुजगाव येथील रवींद्र देशमुख या शेतकऱ्याने राज्यपालापर्यंत या कार्यालयाच्या तक्रारी केल्या आहेत. या कार्यालयाच्या कारभाराला शेतकरी अक्षरशः वैतागून गेले आहेत.
या तक्रारींमुळे शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी 18 ऑगस्ट रोजी या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी बाळू लोखंडे हा खाजगी व्यक्ती शासकीय कागदपत्रे, नकाशे हाताळत असल्याचे दिसून आले. ही कागदे त्याला कोणी दिली, त्यावर सही कोण करते, असा जाब माने यांनी लोखंडे यांना विचारला. त्यावर लोखंडे यांनी ही कागदपत्रे आपणास शिपाई जगताप यांनी दिली व त्यावर मुख्यालय सहाय्यक शिरढोणे हे सही करतात, असे सांगितले.
हा प्रकार ऐकून माने चांगलेच संतापले. शासकीय कार्यालयात खाजगी व्यक्ती काय करतो. त्याच्या हातात शासकीय कागदपत्रे, नकाशे कसे दिले जाऊ शकतात. त्यांनी तयार केलेले नकाशे चुकीचे असले व त्या नकाशाच्या आधारे मोजणी झाल्यास शेतकऱ्यांमध्ये भांडणे लागू शकतात, असे म्हणत माने यांनी लोखंडे शिरढोणे व जगताप यांच्या श्रीमुखात भडकवली. तुम्हाला शासन पगार देते. मग खाजगी लोकांकडून तुम्ही काम का करून घेता, असा जाब यावेळी माने यांनी विचारला.
याप्रकरणी माने यांच्यासह विशाल भोसले व सुनील घेवारी यांच्याविरोधात शिरढोणे यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत जे घडलेच नाही तेही रंगवण्यात आले आहे. शिरढोणे यांनी खोटी फिर्याद दिल्याने माने समर्थक संतप्त झाले होते. त्यांनी तासगाव तालुका बंद ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.दरम्यान, माने व भोसले यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांच्या अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे: