सांगली जिल्ह्यात दळण वळण सुविधा अधिक दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्याकडील सुरू असलेली रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाज आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, मिलिंद कुलकर्णी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, ज्या रस्त्याची कामे मंजूर होऊन निधी उपलब्ध झाला आहे त्या कामांचे टेंडर काढून कामे सुरू करावीत. ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशा रस्त्याचे काम कोणत्या योजनेतून झाले त्या बाबतचा फलक त्या कामाच्या ठिकाणी लावावा. या फलकावर संबधित लोकप्रतिनिधींच्या नावाचाही उल्लेख असावा, अशा सूचना दिल्या.
रस्त्यांच्या कामाबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असलेली बांधकामे व तीर्थक्षेत्र विकासाची कामेही गतीने व्हावीत अशा सूचना पालकमंत्री डॉ खाडे यांनी संबधित अधिकाऱ्यानां दिल्या.
राज्य स्तरावरील योजनेतून मंजूर निधी, आमदार निधी, खासदार निधी व जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजूर निधीतून करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या व अन्य बांधकाम कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या कामांबाबत पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.