– अन्न व औषध प्रशासनाचा इशारा
सांगली : प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी यांनी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम दिवाळीपर्यंत चालू राहणार आहे. मिठाई उत्पादकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे.
अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करताना मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य (use by date) दिनांक टाकावा. कच्चे अन्नपदार्थ व खवा हे परवानाधारक / नोंदणीधारक अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावे जेणेकरुन त्यांची खरेदी बिले राहतीत तसेच प्रत्येक अन्न व्यवसायिकाने त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त परवाना/नोंदणी क्रमांक नमुद करणे अनिवार्य आहे. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावेत. कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्तबाबतची वैद्यकिय तपासणी करावी. मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा १००PPM च्या आतच वापर करावा.
बंगाली मिठाई ही ८-१० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत. स्पेशन बर्फीचा वापर मिठाई बनविण्यासाठी करू नये. माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे. फरसाण तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल हे २-३ वेळाच वापरण्यात यावे त्यानंतर ते RUCO अंतर्गत बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे, अशा सूचना अन्न व्यवसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी मिठाई, दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना फक्त नोंदणी/परवानाधारक आस्थापनांकडून खरेदी करावी. मिठाई दुध दुग्धजन्यपदार्थ व आवश्यकतेनुसार खरेदी करावे. खरेदी करताना use by date पाहुनच खरेदी करावी. उघड्यावरील तसेच फेरीवाल्याकडून मिठाई, खावा (मावा) खरेदी करू नये, माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासाच्या आत करावे तसेच त्यांची साठवणूक योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) करावी. बंगाली मिठाई 8-10 तासाच्या आत सेवन करावी. मिठाईवर बुरशी आढळल्यास त्यांचे सेवन करू नये, खराब / चवीत फरक जाणवला तर ती मिठाई नष्ट करावी, असे आवाहनही श्री. मसारे यांनी केले आहे.
प्रत्येक नागरिकांस सुरक्षित व निर्भेळ अन्न उपलब्ध होण्यासाठी तसेच त्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. व्यावसायिक व ग्राहकांनी अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रं. 1800222365 किंवा कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक 0233-2602202 अथवा fdasangli@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. अन्न पदार्थांबाबत काही तक्रार असल्यास नागरिक प्रशासनाच्या FoScos प्रणालीवरही ऑनलाईन तक्रार करू शकतात, असे आवाहन श्री. मसारे यांनी केले आहे.