तासगाव : तासगाव तालुक्यातील सावळज येथील डोंगरसोनी रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल फिनीक्समध्ये गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. गोवा बनावटीची दारू भरण्यासाठी ठेवलेल्या रिकाम्या बाटल्या, बोटलिंगचे मशीन, बुचे, डीव्हीआर, २ मोबाईल असा सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
विनोद विठ्ठल माने (वय ३७, रा. माने वस्ती, येळावी), सुशांत अशोक गायकवाड (वय २७, रा. गायकवाड मळा, बस्तवडे), गणेश मालोजी शिंदे (वय २४, रा. दहिवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सावळज येथील डोंगरसोनी रस्त्यावर हॉटेल फिनिक्स हा बिअर बार आहे. या बारमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा असून ती दारू ग्राहकांना विकली जात असल्याची माहिती खबऱ्याद्वारे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. शिवाय रिकाम्या बाटल्यांमध्ये गोवा बनावटीची दारू भरून त्याला बुचे लावून त्या बाटल्यांची विक्री ग्राहकांना केली जात असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री उशीरा राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सावळज येथील हॉटेल फिनिक्सवर छापा टाकला.

त्यावेळी हॉटेलच्या मागे असलेल्या भट्टीला लागून असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये गोवा बनावटीच्या १८० मिलीच्या ८९४, ७५० मिलीच्या १५० बाटल्या सापडल्या. तसेच बोटलिंग मशीन, बाटल्यांची २० हजार १९१ बनावट बुचे, रिकाम्या दारूच्या ७२ बाटल्या सापडल्या. त्या जप्त करून दारू भरण्यासाठीचे साहित्य, डीव्हीआर, दोन मोबाईल असा सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे निरीक्षक विजय मनाळे, इस्लामपूरचे निरीक्षक प्रशांत रासकर, दुय्यम निरीक्षक सुनील पाटील, माधवी गडदरे, अजय वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक दिलीप सानप, सचिन सावंत, प्रमोद सुतार, रणधीर पाटील, अमित पाटील, अर्जुन कोरवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.