सांगली : म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रथम प्राध्यान्याने पाणी मागणी अर्ज नमुना 7 भरून लवकरात लवकर पाण्याची मागणी करावी. पाणी मागणी अर्ज नमुना (7) हे योजनेच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात व प्रत्येक सिंचन व्यवस्थापनाच्या शाखा कार्यालयात उपलब्ध केलेले आहेत. ज्यांच्या नावे योजनेची थकीत पाणीपट्टी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी व चालू करावयाच्या पाणी आवर्तनाकरीता आगाऊ रब्बी हंगामाची प्रचलित दरानुसार पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. रा. कोरे यांनी केले आहे.
कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेंतर्गत म्हैसाळ योजनेचे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगांव, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील 71 हजार 697 हेक्टर व सोलापूर जिल्हातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील 10 हजार हेक्टर असे एकूण 81 हजार 697 हेक्टर लाभक्षेत्र असून त्यापैकी 79 हजार 300 हेक्टर इतक्या लाभक्षेत्राची सिंचन निर्मि
ती पूर्ण झालेली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सन 2023-24 या सिंचन वर्षातील रब्बी हंगामामधील पाणी आवर्तन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु करण्यात आले आहे. तसेच पाणी देण्याचे धोरण शेवटच्या भागापासून ते सुरुवातीच्या भागापर्यंत देण्याचे ठरविण्यात आले आहे. सद्यस्थितीत जत भागात पाणी सोडण्यात आले आहे. तसेच कवठेमहांकाळ, तासगांव व मिरज तालुक्यांना दिनांक 11 डिसेंबर 2023 नंतर पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी अभियंता श्री. कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.