सलग तीन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर मंगळवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.मध्यरात्रीही मिरज पूर्व भागासह तासगाव तालुक्याच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.आज बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे.अवकाळी पावसाने रब्बी पिकांना दिलासा दिला असला तरी द्राक्ष, उस, भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.ऊसतोडीवरही परिणाम झाला आहे.
मंगळवारी मध्यरात्री मिरज पूर्व भागातील मालगाव, खंडेराजुरी, भोसे, कळंबी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, बोरगाव, तासगाव तालुक्यातील अंजनी, गव्हाण, मणेराजुरी, सावळज परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातले.अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील शाळू, हरभरा, करडई, गहू या पिकांना पोषक स्थिती निर्माण झाली असली तरी द्राक्ष, उस, भाजीपाला यांना हा अवकाळी पाऊस हानी पोहचवणारा ठरला आहे. द्राक्षामधील अनुष्का, माणिक चमन या जाती या अवकाळीने घडकुजीला बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर फुलोर्यातील द्राक्ष मणी दावण्यासारख्या बुरशीजन्य रोगाला बळी पडण्याचा धोका बळावला आहे. पावसानंतर आज सकाळपासून द्राक्ष बागामध्ये पंपाद्बारे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत होती.