व्याजाच्या पैशासाठी मारहाण केल्याचा आरोप : संशयित परागंदा
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथे व्याजाने घेतलेल्या रकमेच्या दामदुप्पट वसूल करूनही व्याजाच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरपंच संतोष रामचंद्र पाटील याच्यासह चार जणांविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला. माधव अनिल पिसे (वय ३९, रा. वायफळे) यांनी फिर्याद दिली.
गुन्हा दाखल झालेल्यांत रामचंद्र नेताजी पाटील, भरत बाजीराव पाटील व विजय उत्तम नलवडे (सर्व रा. वायफळे) यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व संशयित फरार झाले आहेत.याबाबत माहिती अशी, संतोष पाटील हे वायफळेचे लोकनियुक्त सरपंच आहेत. फिर्यादी माधव पिसे यांनी संशयित त्यांच्याकडून २०१९ मध्ये द्राक्षबागेच्या कामासाठी दोन लाख सत्तर हजार रुपये व्याजाने घेतले होते.
त्या मोबदल्यात पिसे यांनी संशयित संतोष याला रोख व पिसे याचे भाऊ सुधीर पिसे याच्या नावावर गावातील एका पतसंस्थेतून कर्ज काढून ४ लाख असे सहा लाख ६१ हजार ५०० रुपये दिले होते.तरीही संशयित संतोष हा व्याजाचे आणखीन दोन लाख ७० हजार रुपये देणे असल्याचे सांगून दमदाटी करीत होता. संशयित संतोष याने कर्ज वसुलीसाठी ठेवलेले रामचंद्र पाटील, भरत पाटील व विजय नलवडे यांनी गावातील पिसे यांच्या हॉटेल समोर येऊन कर्ज वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर वायफळे येथे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित परागंदा झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.