*माणदेशातील, दुष्काळी,भागातील निंबेवाडी, गावचा चा रानाप्पा

0
25

 

माणदेशातील निंबेवाडीत रानाप्पा धनगर हा आपली बायको केराबाई, मुले दऱ्याप्पा व धुळा यांच्याबरोबर गुण्या-गोविंदाने राहात होता. निंबेवाडीचा भाग हा अपुऱ्या पावसाचा असलेमुळे या भागात पाण्याबरोबरच हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होत असलेमुळे, रानाप्पा हा मेंढरांना चाऱ्यासाठी रानोमाळ फिरून प्रचंड प्रमाणात धडपड करून मेंढरे जगवित होता. रब्बी व खरीप हंगामात सुद्धा पावसाचे प्रमाण कमी प्रमाणात असलेमुळे जनावरांच्या चाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावीत असत. त्यामुळे रानाप्पा आपल्या मेंढरांना चारण्यासाठी दहा-बारा मैलांचे अंतर तुडवीत लांब पर्यंत जावे लागत असत. त्यावेळी रान्नाप्पा हा शेतकऱ्यांना गोड बोलून त्यांच्या जमिनीच्या बांधावरील बाभळीच्या झाडाच्या फांद्या सवळून त्यांचा पाला व शेंगा ह्या परशी कुऱ्हाडीने छाटून मेंढरांना चारीत असत. रात्र झाली तर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात वाघर लावून मेंढरं बसवीत असत. गावच्या ओढ्या लगत किंवा वगळीच्या बाजूने असणाऱ्या माळरानावरील थोडे बहुत असलेले वाळलेले गवत खाण्यासाठी मेंढरांना सोडत असत. दुपारी ओढ्यातील डबक्यातील पाणी मेंढरांना पाजून ओढ्याच्या बाजूला असलेल्या करंजाच्या, लिंबाच्या व निरगुडीच्या झाडाच्या सावलीत मेंढरांना विसाव्यासाठी बसवत असत. त्यावेळी रानाप्पा बरोबर त्याची बायको केराबाई, मुले दऱ्याप्पा, धुळा हे सुद्धा असत. मेंढरांचे लांडग्यापासून संरक्षण व्हावे म्हणून, बंड्या नावाचा धिप्पाड कुत्रा पाळलेला होता. रानापाचे हे सर्व कुटुंब ऊन, पाऊस, थंडी, वादळ, वाऱ्यात फिरून मेंढरांना जगवीत असत. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांची निगा देखभाल करीत असत. तेच त्यांचे नित्य नियमाचे जग झालेले होते.
रानाप्पा धनगर हा निरक्षर, अंगठे बहादूर होता. परंतु त्याची बुद्धिमत्ता तल्लख असलेमुळे गावच्या व्यवहारात सरळ मार्गाने व नीतीमत्तेने बोलत व वागत असलेमुळे त्यांच्या शब्दाला गावातील लोक किंमत देत असत. गावच्या यात्रेत गजी नृत्याच्या कार्यक्रमात आवर्जून हीर-हिरीने भाग घेऊन ढोल वाजवीत असत. गावात सगळ्यांबरोबर मिळून- मिसळून वागत असत. लांडी- लबाडी त्यांच्या रक्तात नव्हती. रानाप्पाचा पेहराव साधारण डोक्याला पटका, अंगात बंडी, धोतर, गळ्यात मोठा गमजा, कानात कुंडल होती. उंची साधारण सहा फुटापर्यंत, चेहरा राकट, वर्ण काळा- सावळा झुबकेदार, मिश्या, दाढी, पायात कातडी चप्पल, हातात उंची पुरी काठी, खांद्यावर घोंगडे अशा पेहरावात रानाप्पा गावच्या वाड्या – वस्त्यावर प्रसिद्ध होता. रानाप्पाची बायको केराबाई ही सुद्धा रंगाने व उंचीने साधारण होती. अंगात नऊवारी इरकल साडी- चोळी, पायात चांदीच्या साखळ्या, हातात बाजूबंद घालत होती. रानाप्पाला खंबीरपणे साथ देत असलेमुळे त्याचा प्रपंचा बऱ्यापैकी चाललेला होता. दऱ्याप्पा व धुळा हे आई-वडिलांचा शब्द ओलांडत नसत.
रानाप्पा दरवर्षी आटपाडीच्या कार्तिक यात्रेत व खरसुंडीच्या यात्रेवेळी काही जुन्या मेंढ्या विकून, त्या पैशातून नवीन मेंढ्या विकत घेत असत व आपल्या मेंढरांच्या कळपात सामील करीत असत. रानाप्पा जुनी मेंढरं विकून आल्यानंतर त्याच्या आठवणीमुळे रात्रीचे जेवण सुद्धा करायचा नाही, एवढी माया तो मेंढरांवर करीत असत. रानाप्पाच्या चांगल्या स्वभावामुळे त्याने अनेक माणसे जोडलेली होती. जवळच्या गावचा संतूशा सनगर हा रानाप्पाचा चांगला दोस्त होता. तो रानाप्पाच्या मेंढराची लोकर घेण्यासाठी हमेशा निंबेगावात येत असत. संतुशा सनगर हा त्या लोकरी पासून घोंगडी व जान चांगल्या प्रतीचे तयार करून आसपासच्या गाव खेड्यात विकत असत. त्याच्या सुबक रंगीबेरंगी कला-कसुरीमुळे घोंगडी व जानचा धंदा चांगला चालत होता. रानाप्पाच्या मेंढराची लोकर व संतूशा सनगराची घोंगडे बनवण्याची कला यामुळे घोंगडी या भागात प्रसिद्ध झालेली होती. रानाप्पाची मुले दऱ्याप्पा व धूळा हे लग्नाच्या वयात आलेनंतर नात्यातील मुली पाहून दोन्ही मुलांची लग्ने समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे करणेत आलेली होती.
रानाप्पाने गरीब परिस्थितीतून पोटाला चिमटे घेऊन चार पैसे जपून ठेवलेले होते. वडिलार्जित जमिनीत भाऊ हिस्से पडलेमुळे रानाप्पाच्या वाटणीला थोडीच जमीन आलेली होती. त्यामुळे जमिनीचे महत्व काय असते हे रानाप्पास माहित होते. आपली मेंढरं चारताना दुसऱ्याच्या जमिनीच्या बांधाला गेलेतरी लोक वाईट वंगाळ बोलतात, याची जाणीव त्यास असलेमुळे, गावच्या सीमेलगत असणाऱ्या केशव अण्णाची दोन एकर जमीन खरेदी करून घेतलेली होती. त्याची वास्तवता अशी होती की, केशव अण्णाची जमीन खरेदी करायला कोणी तयार नव्हते, कारण केशव अण्णाचा भाऊ नारायणराव हा अडथळा निर्माण करीत होता. परंतु केशव अण्णास पैशाची अत्यंत गरज होती. त्याच्या आजारपणामुळे दवाखान्यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे आपला मुलगा धनाजीस सांगून त्यांनी रानाप्पास घरी बोलावून घेतलेले होते आणि पैशाची अडचण सांगितली होती, परंतु रानाप्पाने जमीन घेणेस नकार दिलेला होता, पण केशव अण्णांनी विनंती करून आपली अडचण सांगितल्यामुळे रानाप्पाने जमीन खरेदी केलेली होती. रानाप्पाने जमीन खरेदीच्या वेळी केराबाईच्या अंगावरील दागिने व चांदीच्या तोळबंद्या सोनाराकडे मोडून पैसे घेतले होते. त्यातही पैसे कमी पडतात म्हणून संतूशा सनागराकडून हात उसने पैसे घेतलेले होते. त्यामुळे जमीन खरेदी करता आली होती. रानाप्पा हा दोन एकराचा मालक झाला होता. घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले होते. त्यानंतर रानाप्पाने सदरच्या जमिनीची मेहनत, मशागत करून सदर जमिनीत बाजरी, मटकी, हुलगे, तूर या पिकांची जमिनीत लागवड केलेली होती.
निंबेवाडीत ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली होती. गावात दोन पॅनेल निवडणुकीसाठी उभे राहिले होते. एका पॅनेलमधून रानाप्पाचा भाऊ खंडू हा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभा राहिलेला होता. गावात दुसरे पॅनल हे नारायणरावांनी उभे केलेले होते. सदर निवडणुकी वेळी खंडू हा रानाप्पास म्हणाला, दादा मी ह्या निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. गावातील बरेच लोकांनी निवडणुकीसाठी उभे रहा, म्हणून गळ घातली होती, त्यामुळे मी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे. या गावात तुमच्या शब्दाला मान आहे, त्यामुळे माझ्यासाठी व गावच्या भल्यासाठी गावातील लोकांना सांगून आमच्या पॅनेलला मतदान करणे बाबत तुम्ही सर्वांना सांगा ? तुमच्या शब्दाबाहेर कोण जाणार नाहीत, असे म्हणून खंडूने रानाप्पाचे पाय धरले, त्यानंतर रानाप्पाने खंडूस उठवून उभे केले व म्हणाले खंडू ठीक आहे, सांगतो सर्वांना काळजी करू नकोस, असे रानाप्पाचे शब्द ऐकताच खंडू मनोमन खुश होऊन आपल्या भावाचा निरोप घेऊन निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावच्या पारावर जाऊन रानाप्पाने सर्वांना हात जोडून विनंती केली की, माझा भाऊ खंडू हा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामविकास पॅनेल मधून निवडणूक लढवीत आहे, त्यास व त्याच्या पॅनेलला गावच्या विकासासाठी मतदान करा, अशी हात जोडून विनंती करतो आहे. त्यानंतर रानाप्पाने जमेल तसे लोकांना मतदान करणेबाबत सांगितले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी एकमेकांशी बोला-चाली करून मतदाना दिवशी खंडूला व त्याच्या ग्रामविकास पॅनेला मतदान केलेमुळे सदरचे पॅनेल बहुमताने निवडून आलेले होते. रानाप्पाच्या शब्दाला गावकऱ्यांनी संमती दिली होती, त्यामुळे नारायणरावचे संपूर्ण पॅनेल निवडणुकीत पडलेले असलेमुळे नारायणरावच्या डोळ्यात रानाप्पा खुपू लागलेला होता. रानाप्पाचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून नारायणराव सुडाने पेटलेला होता.
एके दिवशी रानाप्पा, दऱ्याप्पा व धुळा हे सायंकाळी मेंढरांना घेऊन घरी आले. मेंढरांना घराजवळच्याच वाड्यात सोडले, वाडा म्हणजे मोकळ्या जागेत बोराट्याच्या काट्याचा कुंपणाचा मोठा फैस. चहू बाजूनी घालून त्यास बोराट्याच्या झापाचा कुडाचा दरवाजा बनवलेला होता, त्याच वाडा म्हणत असत. दऱ्यापाने मेंढरे आत सोडून कुडाचा दरवाजा बंद करून तिघांनीही हात पाय धुवून घराच्या सोप्यात टाकलेल्या घोंगड्यावर जाऊन बसले होते. घरातील सुनबाईनी तिघांनाही तांब्यात पिण्यासाठी पाणी दिले, त्यानंतर चहा दिले नंतर, केराबाईने घरातील कंदीलाची वात मोठी करत म्हणाली, अहो दुपारी घरी कोर्टाचा माणूस आलेला होता, त्यांनी हे कोर्टाचे नोटीस दिलेले आहे, कोर्टाच्या माणसाला खंडू भाऊजी घरी घेऊन आलेले होते, त्यांनी माझ्या हातात नोटीस देऊन गेले आहेत.रानाप्पा हा त्या कोर्टाच्या नोटीसेकडे आश्चर्याने पहात म्हणाला, कोर्टाचा माणूस काय म्हणाला, त्यात काय लिहिलं हाय? त्यावर केराबाई म्हणाली, काय लिहल आहे ते माहीत नाही बघा ? पण खंडू भाऊजी म्हणत होतं की, केशव अण्णाचा मुलगा धनाजी ने कोर्टाकडून नोटीस दिलेले आहे ? असे ते म्हणत होते, त्यावेळी रानाप्पा व घरातील सर्वजण काळजीत पडले होते,रानाप्पाच्या चेहऱ्यावर काळजीच्या छटा दिसू लागल्या,तो नोटीसेकडे पहात विचारात पडला होता. एका नोटीसीने घरातील सर्वांनाच काळजी टाकले होते.
खंडू हा रानाप्पाच्या जवळ येऊन बसला व म्हणाला, दादा हा सर्व खेळ नारायणरावांनी केलेला आहे, कारण केशव अण्णाची जमीन त्याला कमी भावात घ्यायची होती, परंतु तुम्ही जमिनीची योग्य किंमत केशव अण्णाला दिली होती, त्यांचा राग मनात धरून आणि तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचे पॅनेल पाडलेचा बदला घेऊन आपल्यावर सूड उगविला आहे. पण दादा तुम्ही काही काळजी करू नका, उद्या तालुक्याला जाऊन चांगला वकील पाहून त्यांच्या सल्याने जाऊया ? त्यावर खंडूचे बोलणे मध्येच थांबवित रानाप्पा म्हणाला, अरे त्या नोटीशीत काय लिहिलं हाय ते तर आधी मला सांगा ना ? त्यावर खंडू म्हणाला, दादा त्या नोटिशीत असे लिहिले आहे की, तुम्ही केशव अण्णाची जमीन दांडगाव्याने, फसवून, दमदाटी करून जबरदस्तीने खरेदी पत्र करून घेतलेली आहे, ते खरेदीपत्र रद्द करणेत यावे असे त्या नोटीशीत लिहिले आहे ? हा आरोप धनाजीने त्या नोटीशीत केलेला आहे, त्यावर खंडू म्हणाला , दादा उद्या आपण सकाळी तालुक्याला जाऊया ? त्यावर रानाप्पा म्हणाला, आर खंडू मी कधी आयुष्यात कोर्ट कचेरीची पायरी चढलो नाही, मेंढरं राखणारा माणूस मी, मला कोर्टातलं काय कळणार नाही. त्यापेक्षा उद्या धनाजीलाच बोलावून घेऊया ? त्यावर खंडू म्हणाला, दादा धनाजी हा नारायणरावांचा पुतण्या आहे, तो नारायणरावच्या संपूर्ण आधीन झालेला आहे ? त्याचा काहीही उपयोग होणार नाही, धनाजीला मी दुपारीच बोललो आहे, गावातील चार माणसांनी सुद्धा त्यास सांगितले आहे की, रानाप्पावरची कोर्टातील केस मागे घे ? परंतु तो कोणाचेही ऐकत नाही, धनाजी हा कोर्टात केस करून, भीती दाखवीत आहे. दादा तुम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही, त्यामुळे तुम्हाला कोर्टातून नक्कीच न्याय मिळेल बघा ? तुम्ही घाबरून जाऊ नका ? आपण उद्या तालुक्याला जायचे हे नक्की करूया ? त्यावर दऱ्याप्पा म्हणाला, बाबा तुम्ही उद्या तालुक्याला जाऊन वकील द्या ? काय व्हायचे असेल ते होऊ द्या ? आम्ही उद्या रानात मेंढरं घेऊन जातो, त्याची काळजी करू नका ? त्यावर थोडा वेळ विचार करीत रानाप्पा म्हणाला, धुळा उद्या तू सकाळी लवकर जाऊन, संतूशा सनागरास तालुक्याच्या ठिकाणी घेऊन ये ? त्यानंतर घरात सविस्तर चर्चा झालेवर तालुक्याला जाण्याचे निश्चित करण्यात येऊन सर्वजण जेवण करून झोपी गेले, परंतु रानाप्पा मात्र घोंगड्यावर पडून घराच्या माळवदाच्या लाकडी किलचणाकडे बऱ्याच वेळ पाहत विचार करीत झोपी गेले.
तालुक्याच्या ठिकाणी रानाप्पा, खंडू ,संतुशा, धुळा हे एकत्र आलेनंतर संतूशा व खंडूच्या ओळखीने शेषराव वकिलाच्या घरी पोहोचले, त्यानंतर सर्वजणांनी शेषराव वकिलाच्या घरात प्रवेश करून त्यांना नमस्कार घातला, त्यावर शेषरावने सुद्धा हसत-हसत संतूशाकडे पाहत नमस्कार घालून म्हणाले, कसे काय येणे केले आहे ? हे विचारातच संतूशा म्हणाला, डॉक्टर व वकीलाकडे जायला मुहूर्त बघावा लागतो काय ? त्यावर सर्वजण हसू लागले, त्यानंतर संतूशाने रानाप्पा ,खंडू व धुळा यांची ओळख करून देऊन म्हणाले, रानाप्पाच्या जमिनी संदर्भात कोर्टाची नोटीस आलेले आहे हे बघा असे म्हणून, त्यांनी नोटीस खरेदीपत्र, फेरफार, सातबाराचा उतारा ही सर्व कागदपत्रे वकिलाच्या हातात दिली, त्यानंतर संतूशा म्हणाला, वकील साहेब रानाप्पा हा माझा दोस्त आहे, त्याच्यावर विनाकारण बालट आणलेले आहे.गावांमध्ये जमिनीचा व्यवहार हा चार माणसात ठरविलेला होता, तेवढे पैसे केशव अण्णाना दिलेले आहेत. त्यांची जमीन फसवून दांडगाव्याने जबरदस्तीने घेतलेली नाही, गावच्या नारायणरावांना ही जमीन घ्यायची होती, पण केशव अण्णांनी त्याला जमीन दिली नाही, हा एक भाग. दुसरा असा की, गावच्या निवडणुकीमध्ये रानाप्पाने आपल्या खंडू भावास मदत केली, म्हणून या व्देषापोटी, बदला घेण्याच्या हेतूने नारायणरावने हा खेळ आपला पुतण्या धनाजीच्या मदतीने केलेला आहे, धनाजी हे करत नव्हता, परंतु त्यास नारायणरावने कोर्टात केस करणे भाग पाडलेले आहे, असा हा सगळा विषय आहे, यातून वकील साहेब तुम्ही काय तो मार्ग काढावा, यासाठी तुमचेकडे आलो आहे.
शेषराव वकिलांनी सर्व कागदपत्रे पाहून घेतली व म्हणाले, खरेदीपत्र करताना तुम्ही चतु: सीमा लावलेल्या नाहीत, जमीन खरेदी करणे अगोदर वर्तमानपत्रात नोटीस दिलेली नाही, त्यावर रानाप्पा म्हणाला, वकील साहेब कायद्यातल आम्हाला काय कळत नाही, केशव अण्णाला पैशाची गरज होती, म्हणून हे खरेदी पत्र केले, शब्दाला माणूस पक्का होता. त्यावर भरोसा ठेवून हा व्यवहार केला होता. तो मयत झालेवर ह्या भानगडी झालेल्या आहेत. त्यानंतर शेषराव वकिलांनी सर्व ऐकून घेतले, त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही काहीही काळजी करू नका, निर्दास्त रहा, काय करायचे आहे ते मी पाहतो, आता तुम्ही वकील पत्रावर सही करा आणि तुम्ही चिंता न करता घरी जावा. त्यानंतर सर्वजणांनी वकिलास नमस्कार घालून बाहेर आले. त्यानंतर रस्त्याकडे असलेल्या वडाच्या झाडाजवळ येऊन थांबले. त्यावेळी संतूशा रानाप्पाकडे पहात म्हणाला, रानाप्पा तू काय घाबरू नको, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. कोर्टाच्या तारखेवेळी आम्ही तुझ्याबरोबर येत जाऊ, घाबरायचे कारण नाही, तुझ्यावर हे बालट आणलेले आहे आणि तुझ्यावर जे आरोप ठेवलेले आहेत त्यातून तुझी मुक्तता करणेसाठीच आपण शेषराव वकील दिलेला आहे. परंतु मला असे वाटते कोर्टाच्या तारखा सुरू होण्याच्या अगोदर आपण दोघे मिळून देवदर्शनला जाऊया, पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जाऊन त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन येऊया, असे माझ्या मनास वाटते आहे यावर तुझे काय मत आहे ? त्यावर रानाप्पा म्हणाला ठीक आहे, तुझे जे मत आहे ते योग्यच आहे, आपण चार दिवसांनी जाऊया, असे दोघांचेही पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे ठरले त्यानंतर संतुशाने सर्वांचा निरोप घेऊन निघून गेल्यानंतर रानाप्पा, खंडू व धुळा हे समाधानाने निंबेवाडीच्या रस्त्याने चालत घराकडे निघाले होते.
रानाप्पा हा प्रत्येक तारखेच कोर्टात हजर राहत होता, त्यामुळे दऱ्याप्पा व धुळा हे मेंढ्या चारणेसाठी रानात घेऊन जात असत, दिवसा मागून दिवस जात होते, तारखावर तारखा पडत होत्या, रानाप्पाचे तालुक्यात व कोर्टात येणे जाणे वाढलेले होते, दुनियादारीची भाषा व्यवहार हा रानाप्पास समजू लागलेला होता. कोर्टात केस दाखल करून चार वर्षे होत आलेली होती, रानाप्पाच्या चांगल्या स्वभावामुळे हुशारपणामुळे शेषराव वकील बरोबर चांगलीच दोस्ती झालेली होती. रानाप्पाच्या बोलक्या स्वभावामुळे दोघांचाही जिव्हाळा वाढलेला होता. कोर्ट कामकाज झाल्यावर शेषराव वकील व रानाप्पा हे बऱ्याच वेळ बोलत बसत असत.एकमेकांना गोष्टी सांगत असत, एकमेकांना कोडे (हुमान) घालणे मध्ये दोघांचाही हातखंडा झालेला होता.
एके दिवशी कोर्टाच्या तारखेवेळी रानाप्पा व धनाजी हे कोर्टात हजर होते, कोर्ट कामकाज संपल्यानंतर रानाप्पा हा कोर्टाच्या बाहेर येऊन थांबला होता, थोड्या वेळानंतर धनाजी जवळून जाताना रानाप्पाने धनाजीला जवळ बोलावून घेतले व त्याच्या हाताला धरून कोर्ट आवारात असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या सावली जवळ जाऊन उभे राहिले, त्यावेळी धनाजी हा आश्चर्याने रानाप्पाकडे पाहू लागला होता. त्यावेळी रानाप्पा हा धनाजीस म्हणाला, मला तुझ्याबरोबर थोडे बोलायचे आहे, मी काय तुला वाईट वंगाळ बोलणार नाही, त्यावर धनाजीने चेहरा हलवून मूकसंमती दिली, नंतर रानाप्पा म्हणाला, धनाजी तुझ्या वडिलांची जमीन मी फसवणूक करून घेतलेली नाही, तुझ्या वडीलाच्या आजारपणात त्यांना कोणीही पैशाची मदत केलेली नाही, हे तुला माहीतच आहे. त्या वेळी तूच मला माझ्या घरी बोलवायला आलेला होता, त्यावेळी तुझ्यासमोर त्यांनी घरची परिस्थिती त्यांचे आजारपण, दवाखाना याबाबत सांगितलेले होते, त्यामुळे तुझ्या घरच्या परिस्थितीचा विचार करून आणि तुझ्या वडिलांच्या चांगल्या स्वभावामुळे मी त्यांना उसने पैसे द्यायला तयार झालेलो होतो, ते स्वाभिमानी असलेमुळे त्यांनी जमीन मला विकली होती, हे तुला माहित आहे ना ? केशव अण्णा असेही म्हणाले की, हात उसने घेतलेले पैसे वेळवर परत करायला परत कुठून पैसे येणार त्यापेक्षा जमीनच खरेदी करून घे, असे त्यांनी हट्ट धरला होता, म्हणूनच मी जमीन खरेदी केलेली आहे. यात माझे काय चुकलेले आहे, रानाप्पा असे म्हणताच, धनाजी मान खाली घालून जमिनीकडे पहात उभा होता.
त्यावेळी धनाजीच्या मनात अनेक विचार येऊ लागले होते, आपले कुठेतरी चुकतंय याची जाणीव होऊ लागलेली होती. कोर्टात केस दाखल करताना गावातील अनेक जन म्हणत होते, रानाप्पा धनगर हा व्यवहार सोडून वागलेला नाही, त्याचे काहीही चुकत नाही, विनाकारण नारायणरावचे ऐकून त्यास त्रास देऊ नकोस, नारायणरावांपासून सावध रहा, असेच लोक सांगत होते, परंतु चुलत्याच्या अभिमानापोटी मी हे करीत होतो असे धनाजीच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू असतानाच, त्याच्या लक्षात आले की, रानाप्पा हा आपल्या जवळच उभा आहे. त्यावेळी धनाजी भानावर येऊन आजूबाजूला पाहू लागला, त्यावेळी रानाप्पाने धनाजीचा हात आपल्या हातात घेत बोलू लागला व म्हणाला, धनाजी हे माझे पुराण तुला विनाकारण ऐकायला लावले बघ ? तर मी तुला ह्यासाठी बोलावले आहे की, तुझ्या थोरल्या मुलाचे इंजिनिरिंगचे अॅडमिशन पैशा अभावी थांबलेले आहे, हे मला समजलेले आहे, तुला वाईट वाटत नसेल तर सांगतो, मला तुझ्या घरची परिस्थिती समजली आहे, त्यामुळे मी काय बोलतो ते नीट ऐक, येत्या शनिवारी आटपाडीच्या बाजारा दिवशी सकाळी शेळ्या- मेंढ्यांचा बाजार भरतो आहे, त्या बाजारात माझ्याकडील मेंढा व बोकड विकून तुझ्या मुलाच्या इंजीनियरिंग कॉलेजच्या अॅडमिशन साठी पैसे देतो ? मुलाचे शाळेचे नुकसान करू नकोस, तुझ्याकडे ज्यावेळी पैसे येतील त्यावेळी आणून दे, राहिली गोष्ट कोर्टाची तर निकाल कुणाच्याही बाजूने लागू दे, आपण तारखा खेळत बसू या ? माझे नाव रानाप्पा धनगर आहे, माझे धन हे शेळ्या- मेंढ्या आहे. त्यामुळे येत्या शनिवारी तू पैसे घेऊन जा, असे म्हणतात धनाजीचे डोळे भरून आले होते. त्यामुळे रानाप्पाला त्याने घट्ट मिठी मारली होती, धनाजीच्या दोन्ही डोळ्यातील अश्रू रानाप्पाच्या बंडीवर पडत होते.
काही दिवसानंतर धनाजी कोर्टाच्या आवारात येवून थांबलेला होता, शेषराव वकील व रानाप्पास पाहताच पुढे येऊन धनाजी व त्याच्या मुलाने दोघांच्याही पाया पडले, त्यानंतर रानाप्पास व वकिलास पेढा दिला, त्यावेळी धनाजी म्हणाले, माझ्या मुलाच इंजीनियरिंग साठी कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळालेले आहे, त्यांचे हे पेढे आहेत, त्याचे सर्व श्रेय हे रानाप्पाचे आहे. माझ्या डोक्यावरचा मोठा भार त्यांनी कमी केला आहे. रानाप्पाचे उपकार आमच्या कुटुंबावर झालेले आहेत, असे म्हणून धनाजीने रानाप्पास मिठी मारली, हे सर्व शेषराव वकील पाहत होते, त्यांना आश्चर्य वाटले, वादी व फिर्यादी एकमेकांना मिठी मारतात,याचा त्यांना उलघडा होईना, त्यावेळी धनाजी व त्याचा मुलगा नमस्कार घालून कोर्टाच्या बाहेर पडलेले होते.
शेषराव वकील कोर्टात गेले, त्यावेळी धनाजीचे वकील म्हणाले, शेषराव, धनाजीने कोर्टातील दावा मागे घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही पुढील प्रोसेस सुरू करा असे म्हणून ते निघून गेले, त्यावेळी शेषराव वकील स्वतःशीच म्हणाले, नेमकी भानगड काय झाली, ती रानाप्पा शिवाय समजायची नाही, असे म्हणून कोर्टाच्या पुढील कामात ते व्यस्त झाले.
निंबेवाडीत गावच्या पारावर चर्चा चालली होती की, तालुक्याला, मंत्री, महोदय हेलिकॉप्टरने येणार आहेत, ही वार्ता धुळाच्या कानावर पडली होती, त्याची इच्छा झाली की, आपण आपल्या डोळ्याने हेलिकॉप्टर पहायचे म्हणून त्याने आपला मनोदय आईस व थोरल्या भावात सांगितला होता. धुळाची इच्छा पाहून त्यास तालुक्याला जायचे परवानगी दिली व म्हणाले, तुझे वडील कोर्ट कामासाठी तालुक्याला गेलेले आहेत. त्यांच्याकडून पैसे घेवून घरी येताना वाण्याच्या दुकानातून किराणा मालाचे सामान घेवून ये असे सांगितलेमुळे, धुळा मनोमन खुश होऊन लागलीच तालुक्याला निघाला. तालुक्यात आल्यावर त्याने माहिती घेऊन हेलिकॉप्टर कुठे उतरते ही माहिती करून सदर जागेवर जाऊन थांबला होता. त्या ठिकाणी बरीच गर्दी झालेली होती, काही अवधीत नंतर हेलिकॉप्टर आले, मंत्री महोदय खाली उतरले, लोकांनी हार-तुरे घालून त्यांचा जय जयकार केला. त्यानंतर मंत्री महोदय व जमावातील गर्दी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन लागली होती. त्यावेळी एक जण म्हणाला, कार्यक्रमाला चल, इथे काय थांबलाय, त्यावर धुळा म्हणाला, मला हेलिकॉप्टर पाहायचे होते, म्हणून आलो आहे, सदरचा इसम धुळ्याच्या चेहऱ्याकडे पहात निघून गेला, बराच वेळानंतर धुळा हा शेषराव वकिलाच्या घराचा रस्ता धरून चालायला लागला होता.
शेषराव वकील व रानाप्पा हे कोर्टातून घरी आले होते, त्यावेळी बाहेर धुळा वाट पाहत थांबला होता. त्याने वडिलांना सांगितले, आईने येते-वेळीस किराणा सामान आणायला सांगितले आहे.त्यावर रानाप्पा त्यास होय म्हणून, धुळास घेऊन वकिलाच्या घरात बसले. चहापाणी झालेनंतर शेषराव वकील म्हणाले, रानाप्पा तु नीतिमत्तेने व करुणा या भावनेने वागलेमुळे कोर्ट कामात तुझा जय झालेला आहे. मी आज अत्यंत खुश आहे, आता इथून पुढे तू माझ्याकडे येशील का नाही हे मला माहित नाही, आपली दोस्ती अशीच राहू दे, त्यामुळे आज एकमेकांना शेवटचे कोडे घालूया ? तू जिंकला तर मी तुला दहा रुपये देणार आणि मी जिंकलो तर तू मला एक रुपया द्यायचा आहे असे दोघात ठरले. त्यानंतर शेषराव वकील म्हणाले, आज तू मला हुमान (कोडे) घाल असे म्हणताच, रानाप्पाने थोडा वेळ विचार करून कोडे (हुमान) घातले, ते कोडे असे की, असा कोणता प्राणी आहे जो पाण्यावर चालतो, जमिनीवर चालतो व आकाशात सुद्धा चालतो या कोड्याचे उत्तर द्या, वकील साहेब असे म्हणून रानाप्पा टक लावून वकिलाकडे पहात होते, शेषराव वकीलाला विचारात पाडले, आजचे कोडे अवघड आहे असे म्हणून विचार करीत बसले होते, आपल्या वडिलांनी कोडे (हुमान) घातले आहे ते धुळाला सुद्धा समजेना, शेषराव वकील म्हणाले, आपण नेहमी कोडे एकमेकांना घालतो पण आजचे कोडे वेगळेच आहे, मला काय याचे उत्तर येत नाही असे म्हणून त्यांनी कोटाच्या खिशातून दहा रुपये काढून रानाप्पाच्या हातात ठेवले व म्हणाले रानाप्पा मी हरलो आहे, या कोड्याचे उत्तर सांग ? त्यावर थोडावेळ रानाप्पा हा शांत बसला व त्याने आपल्या बंडीच्या खिशातून एक रुपया काढला व म्हणाला, वकील साहेब मला तरी या कोड्याचे उत्तर कुठे माहित आहे ? त्यामुळे तुम्ही जिंकला आहात, हा घ्या तुमचा एक रुपया… असे म्हणून रानाप्पा हसू लागला, त्यावर शेषराव वकिलांनी सुद्धा रानाप्पाच्या चाणाक्ष बुद्धीचे मनोमन कौतुक करून ते हसू लागले होते.
त्यानंतर रानाप्पाने शेषराव वकिलास नमस्कार घालून, धुळास घेऊन बाहेर आले व किराणाचे सामान आणण्यासाठी धुळास दहा रुपये दिले व त्यास म्हणाले, मी तांबोळीच्या दुकानातून पान- सुपारी घेतो, तू वाण्याच्या दुकानातून सामान घेऊन ये, असे म्हणून रानाप्पा हे पानाच्या दुकानाकडे जाऊ लागले होते, त्यानंतर थोड्यावेळाने धुळा कापडी पिशवीत किराणा दुकानातुन सामान घेऊन आला, त्यानंतर रानाप्पा व धुळा हे निंबेवाडीच्या रस्त्याने चालू लागले होते. रानाप्पाच्या डोळ्यासमोर साडेचार वर्षातील घडामोडी त्याच्या नजरेसमोरून जाऊ लागल्या होत्या. परंतु त्याने आपले इमान सोडले नाही, त्यामुळे नियतीने न्याय मिळवून दिलेला होता. कोर्टात काय घडले हे घरच्या लोकांना सांगण्यासाठी तो अधीर झालेला होता. रस्त्याने चालताना शांत वातावरणात फक्त रानाप्पाच्या कातडी चप्पलचा आवाज कर-कर येत होता.
आयु.विलास खरात
लेखक, आटपाडी जि.सांगली.
मो.नं.९२८४०७३२७७

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here