सांगली : रस्ता सुरक्षितेबाबत 1948 साली पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेने शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती आवश्यक असल्याबाबत राज्यातील प्रत्येक शाळेत RSP हा विषय असण्याची गरज भासवून निर्मिती केली. पोलीस विभागाने नेहमी यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यंदाचे वर्ष पोलीस विभागाने निर्माण केलेल्या (आरएसपी) रस्ता सुरक्षा दलाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने हा विषय राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत अनिवार्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल सांगली चे उप-महासमादेशक अनिल शेजाळे यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे एस सी ईआर टी येथे शासनाने नेमलेल्या गाभा समिती पुढे सादरीकरण केले.
उप-महासमादेशक अनिल शेजाळे म्हणाले, आर एस पी हा विषय शिक्षण विभागाने वैकल्पिक ठेवून राज्यभर मान्यता दिली, परंतु आज वाढत्या लोकसंख्येप्रमाणे आधुनिक वाहनांची निर्मिती व वाढ तसेच अपुऱ्या रस्त्यांमुळे अपघाताची समस्या गंभीर बनू लागली आहे. प्रतिवर्षीय रस्ता सुरक्षाबाबत उपाय करूनही रस्ते अपघातात अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने विद्यार्थी व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतो. पोलीस विभाग व परिवहन विभाग प्रतिवर्षी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, पण यासाठी प्रत्येक नागरिकात ट्रॅफिक सेन्स निर्माण होणे गरजेचे वाटते. त्यासाठी बालवयातच वाहतूक साक्षरता निर्माण केली तर या वाढत्या अपघातांना आळा बसवण्यात नक्कीच यश मिळू शकते. आज हे वास्तव बदलण्यासाठी सामान्य नागरिकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हे वास्तव बदलण्यासाठी शालेय आरएसपी साठी प्रोत्साहन देणे गरजेचे असून, हा आरएसपी विषयी राज्यातील प्रत्येक शाळांत अनिवार्य करणे, तसेच हा विषय फक्त माध्यमिक शाळांसाठी न ठेवता हा उच्च माध्यमिक साठी ठेवणे गरजेचे आहे. तरच पुढील काही वर्षात याचा चांगला परिणाम पहावयास मिळेल.
शिक्षण विभागाने यात अधिक विशेष पुढाकार घेऊन हा विषय अनिवार्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आज महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर ही अधिकृत संघटना या कामासाठी अविरत गेली साठ वर्षे काम करत असून हा आरएसपी विषयी राज्यातील प्रत्येक शाळेत अनिवार्य व्हावा व सोई सुविधा मिळाव्यात अशी मागणी करत आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे एस सी ईआर टी येथे झालेल्या गाभा समिती पुढे नवीन येऊ घातलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या विषयाचा समावेश व्हावा, व यास सोई सुविधा मिळाव्यात,म्हणून राज्याचे शिक्षण सहसंचालक व सर्व शिक्षण प्रमुख व त्यांच्या समितीकडे हा विषय गांभीर्याने मांडला असून, रस्ते अपघातात होणारी जीवित हानी तसेच अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रस्ता सुरक्षितेचा विषय कोविडप्रमाणे गांभीर्याने घेतला पाहिजे. तसा प्रस्ताव दिला असल्याचे उप-महासमादेशक अनिल शेजाळे यांनी सांगितले.