सांगली : मध्यप्रदेशातून आणलेल्या जिवंत काडतुसासह पाच अग्निशस्त्रे (पिस्तुल) कवटेमहाकांळ तालुक्यातील एका तरुणाकडून येथे जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील कारवाईत त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी दिली.
घातक हत्यारे बाळगणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक बसवराज तेली यांनी दिले आहेत. या अनुषंगाने दि.२१ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील हवालदार सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राजकुमार पांडुरंग पाटोळे (वय २७ रा.नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अवैध अग्निशस्त्र (पिस्तुल) बाळगले असून तो नागज फाटा येथे येणार आहे.
पोलीस पथकांने त्यांची झडती घेतली असता पाठीस अडकवलेल्या सॅकमध्ये कापडात गुंडाळलेले १ देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह, ४ देशी बनावटीचे मेपटे आणि ६ जिवंत काडतुसे मिळून आली. सदरची अग्निशस्त्रे ही मन्नावर, जि, धार, राज्य मध्यप्रदेश येथून आणले असल्याची कबुली त्याने दिली. जप्त केलेल्या शस्त्रांचे मूल्य १ लाख ३३ हजार रुपये आहे. त्याच्या विरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे.