जत : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपणास पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे हे आमचे दुर्दैव आहे यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील जी वंचित ६५ गावे आहेत त्या प्रत्येक गावात म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे. म्हैसाळच्या पाण्यासाठी जनरेटयांची गरज असून जत पूर्व भागात त्यासाठी तीव्र आंदोलन उभारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
जत तालुक्यातील संख येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे चैतन्य इंडिया फिन क्रिडिट प्रा. लिमिटेड कंपनीच्या वतीने खास मुलांसाठी वॉटर फिल्टर देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हभप तुकाराम बाबा महाराज बोलत होते. यावेळी कंपनीचे जत युनिटचे युनिटचे व्यवस्थापक अनंद पनचमाळे, कवठेमहाकाळ युनिटचे व्यवस्थापक अमित मोरे, शाखा व्यवस्थापक अण्णासो सावंत, शिवाजी वाघमोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार बिराजदार यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन, प्रशासनाने पाण्यासाठी जतकरांची कशी चेष्टा लावली आहे हे उदाहरणासह सांगितले. वर्षानुवर्षे पाणी देणारच असे आम्हाला सांगण्यात येत होते पण प्रत्यक्षात ज्यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही संख ते मुंबई पायी दिंडी काढली त्यावेळी आम्हास थेट लेखी देण्यात आले की जतला द्यायला पाणीच शिल्लक नाही. ऐतिहासिक पायी दिंडी नंतर जतकरांना आमच्या आंदोलनानंतर कळले की पाणीच शिल्लक नाही, पाणीच शिल्लक नव्हते ही वस्तुस्थिती असताना आम्हास पाणी देण्याचे आश्वासने देण्यात आली हे जनतेने लक्षात घ्यावे. पाण्यासाठी श्रेयवाद नको तर पाणी आले पाहिजे यासाठी सर्वांनी एकसंघ लढा दिला पाहिजे. पाण्याच्या या लढ्यात आपण श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असून आपणही सहकार्य करावे असे आवाहन केले.
चैतन्य इंडिया फिन क्रिडिट प्रा. लिमिटेड कंपनीच्या वतीने खास मुलांसाठी वॉटर फिल्टर दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुमार बिराजदार यांनी कंपनीचे आभार मानले. यावेळी बोलताना कंपनीचे अनंद पनचमाळे, अमित मोरे, अण्णासो सावंत यांनी कंपनीचे कार्य सांगितले.