सेल्फीचा अतिरेक ही विकृती !

0

कुठे नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्या परिजनांना त्या ठिकाणची आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या कोनांतून सेल्फी काढण्याचे आणि काढलेले फोटो स्टेटसला ठेवून लाईक्स आणि कमेंट मिळवण्याचे हल्ली फॅडच आले आहे. बऱ्याच तरुण तरुणींना या सेल्फीचे जणू व्यसनच जडलेले असते. त्यासाठी ही मंडळी फ्रंट कॅमेरा चांगल्या पिक्सलचा असलेला स्मार्ट फोन खासकरून खरेदी करतात. या व्यसनाच्या अधीन झालेली ही मंडळी देहभान विसरून जिथे जातील तिथे सेल्फी घेत असतात. अनेक मंदिरांमध्ये, आश्रमांमध्ये, लेण्यांमध्ये, प्रदर्शनांमध्ये, पुरातन आणि प्राचीन वस्तूंच्या वस्तू संग्रहालयामध्ये ज्या ठिकाणी छायाचित्रे काढण्यास सक्त मनाई असल्याचे फलक लावलेले असतात अशा ठिकाणीही ही मंडळी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

 

Rate Card

याठिकाणी यांना कोणी हटकले तरी लपून छपून सेल्फी घेण्याचे यांचे प्रयत्न चालुच असतात. ओठांचा चंबू करून किंवा चेहऱ्यावर बनावटी हास्य आणून वेगवेगळ्या पोजमध्ये यांना सेल्फी घेताना पाहिल्यावर काहीवेळा हसूही आवरता नाही. डोंगराळ भागात, दरीच्या अथवा धबधब्याचा ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याच्या नादात कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी खासकरून पावसाळी दिवसांत वृत्तपत्रांतून वाचनास येतात. रेल्वे ट्रॅकच्या नजीक धावत्या ट्रेनसह  सेल्फी घेणारेही काही महाभाग पाहायला मिळतात. ट्रेनचा नीटसा अंदाज न आल्याने यातील काही महाभागानी आपला जीव गमावला आहे तर काही आयुष्यभरासाठी जायबंदी झाले आहेत. अशा जीवघेण्या घटना वारंवार घडूनही सेल्फीप्रेमींच्या संख्येत आणि त्यांच्या सेल्फीप्रेमात आजतागायत तिळमात्र फरक पडलेला नाही. सेल्फीचा अतिरेक केवळ व्यसन नसून ती एक विकृती असल्याचेही काही सेल्फीप्रेमींच्या विचित्र वागण्यातून दिसून येते. अशी जीवघेणी विकृती सुजाण तरुण-तरुणींनी आपल्यापासून दूर ठेवलेलीच योग्य ठरेल. 

 
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई    

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.