६५ गावांच्या पाण्यासाठी उमदी- विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखणार | ‘या’ संघटनेने दिला इशारा

0
उमदी : जत पूर्व भागातील वंचित ६५ गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या, मायथळ कॅनॉल पासून गुडडापूर, अंकलगी, संख तलावात सायपन पद्धतीने म्हैसाळचे पाणी येवू शकते पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे. पाणी उशाला कोरड घशाला पडली आहे तेव्हा यासंदर्भात ठोस निर्णय घ्या, रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या, जत पूर्व भागासह ज्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे

 

तेथील तलावाची दुरुस्ती करा, बंधाऱ्यांची दुरुस्ती करा, संख मध्यम प्रकल्पातील कॅनेलची दुरुस्ती करा, वाढीव लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करावा, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा, दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा या प्रमुख मागण्यांसाठी अंकलगी नंतर बालगाव येथे येत्या एक फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र।संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

 

आंदोलनाचा एक भाग म्हणून रक्त घ्या पण पाणी द्या ही मागणी करत आंदोलनकर्ते आंदोलनस्थळीच रक्तदान करणार आहेत. त्याचबरोबर उमदी- विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, जत पूर्व भागातील वंचित ६५ गावांच्या पाण्यासाठी आपला राजकारणविरहित अविरत लढा सुरू आहे. मोर्चे, उपोषण, रस्ता रोको, संख ते मुंबई मंत्रालय ऐतिहासिक पायीदिंडी यासह आजी, माजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, म्हैसाळचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. मुंबईला पायीदिंडी गेल्यानंतर जतला द्यायला पाणीच नाही, पाणी देणार कोठून असे सांगण्यात आले तेव्हाच जतला पाणी देवू अशी आश्ववासने देणाऱ्या नेत्यांचे पितळ उघडे पडले तसेच मायथळ मुख्य कालव्यापासून माडग्याळला म्हैसाळचे पाणी सायपन पद्धतीने येऊ शकते हे आपणच प्रथम निदर्शनास आणून दिले ही वस्तुस्थिती आहे. सध्या हेच पाणी गुडडापूर, अंकलगी, संख तलावातून बोर नदी पत्राद्वारे उमदीपर्यत येवू शकते ते पाणी द्यावे व विस्तारित म्हैसाळ योजना तातडीने मार्गी लावावी ही आपली प्रमुख मागणी असल्याचे बाबांनी सांगितले.

 

रक्त घ्या पण पाणी द्या या अनोख्या आंदोलनास अंकलगी येथून सुरुवात झाली. आंदोलनस्थळी ७५ हुन अधिक जणांनी रक्तदान केले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कामे मार्गी लावू सांगितले पण अद्याप हालचाल नाही. ६५ गावांचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून पुढील सहा महिने प्रत्येक गावात अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी व उमदी पोलीस ठाणे यांना यासदर्भातचे निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले. यावेळी दुडाप्पा कोटी, रमेश माळी राजकुमार हविनाळ, संतोष आवटी, भीमाशंकर बागली, नितीन दुधगी, विठ्ठल चकवादी, प्रभाकर लोणी, गुलाबशा मकानदार, शिवनिंगप्पा बिरादार, अनिल वाणी, महादेव माळी, इमामसाब मुल्ला, अनिल कोटी, गोपाळ माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.