जत : मागील १८ तारखेपासून माझी तब्येत बरी नव्हती. संख येथील पाणी परिसदेवेळी खालावली होती.त्याच काळात विस्तारित म्हैसाळ योजनेला ९८९ कोटी मिळाले. योजनेची स्वप्नपूर्ती झाली. त्याचबरोबर आता माडग्याळहुन संखला पाणी आणण्यासाठी २६ कोटींची निविदा आज प्रसिद्ध झाली आहे. जत तालुक्यातील प्रत्येक गावात कृष्णामाई अवतरणार याचा मनस्वी आनंद होत आहे. तीन पिढ्याच्या संघर्षानंतर कृष्णेचे पाणी तालुक्यात सर्वत्र येणार असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत,अशी माहिती हभप तुकाराम बाबा यांनी दिली.
तुकाराम बाबा म्हणाले,२०१८ च्या भयावह दुष्काळानंतर पाण्यासाठीचा माझा लढा सुरू झाला. श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संख, गुडडापूर, माडग्याळ येथे पाणी परिषदा घेतल्या.
गावोगावी बैठका घेतल्या, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयावर धडक मोर्चे काढणे, लाक्षणिक उपोषणे करत म्हैसाळचे हक्काचे पाणी जतला मिळालेच पाहिजे अशी आग्रही व आक्रमक भुमिका घेतली. ०७ जून २०१९ रोजी पंढरीची वारी सोडून जतच्या पाण्यासाठी ऐतिहासिक संख ते मुंबई मंत्रालय ५०० किलोमीटर पायीदिंडी काढली. पाण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड तासाच्या भेटीत जतकरांच्या व्यथा त्यांचासमोर मांडल्या. खा.उदयनराजे भोसले, खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, अदिती तटकरे यांच्यासह म्हैसाळच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
माडग्याळ, गुडडापुर तलावात पाणी जावू शकते हे प्रथम निदर्शनास आणून देत या भागात पाणी यावे यासाठी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मोर्चे, आंदोलने, पायी दिंडी काढूनही शासन लक्ष देत नसल्याने अखेर जलचळवळीला लोकचळवळीचे बळ देण्यास सुरुवात केली. मायथळ येथून माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी व्हसपेठ, गुडडापूर, अंकलगी, संख भागात सोडावे तसेच ६५ गावाच्या विस्तारित योजनेसाठी उर्वरित निधी देवून कामे सुरू करावीत यासाठी जानेवारीमध्ये ६५ गावात जनजागृती मोहीम राबवली. अंकलगी येथील महादेव मंदिरात ग्रामस्थांसह लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली. रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी केली. तरुणांना पाण्यासाठी रक्तदान करा असे आवाहन केले.
तुकाराम बाबा म्हणाले,आवाहनानुसार अंकलगीत ७५ हुन अधिक जणांनी पाण्यासाठी रक्तदान केले. या आंदोलनाची दखल घेत म्हैसाळ विभागाचे प्रमुख अधीक्षक कार्यकारी अभियंता पाटोळे यांनी अंकलगी गाठले त्यांनी लवकरच या कामाची निविदा काढू असे आश्वासन अंकलगी येथे दिले. दर महिन्याला प्रत्येक गावात जावून रक्त घ्या, पाणी द्या हे आंदोलन राबविण्याचा संकल्प करत साखळी उपोषण सुरू केले.त्यानुसार फेब्रुवारीमध्ये बालगाव येथे पंढरपूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला व रस्त्यावरच पाण्यासाठी आंदोलन सुरु केले. राष्ट्रीय महामार्गावरच बालगावमध्ये ५२ तरुणांनी रक्तदान केले. नुकतीच संख येथेही पाणी परिषद घेतली.