सांगली : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान सांगली जिल्ह्यांकरीता दि. 7 मे रोजी होणार आहे. मतदान टक्केवारी वाढावा म्हणून तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 80 x 55 फूट इतक्या आकाराची भव्यदिव्य रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, दादासाहेब कांबळे, श्रीमती निता शिंदे, डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, तहसिलदार लिना खरात, मिना निंबाळकर यांच्यासह प्रशसनातले इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना मतदान करण्यासाठी मतदान प्रतिज्ञा दिली. इस्लामपूर येथील रांगोळी कलावंत सचिन अवसरे (वय ३४) यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते शाल व पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच भव्यदिव्य रांगोळी साकारल्याबद्दल श्री. अवसरे यांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप टाकली. “ वृध्द असो वा जवान ; अवश्य करा मतदान ” ही कॅचलाईन घेवून श्री. अवसरे यांनी ही रांगोळी साकारली.