पुण्यात १७ एप्रिलला वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळल्याने उबाळेनगर बसथांब्याजवळील एक होर्डिंग रस्त्यावर कोसळले. यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी चार ते पाच चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. रस्त्यावरच होर्डिंग कोसळल्याने यावेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ४ ते ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याच दरम्यान परिसरातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. अर्थात होर्डिंग कोसळल्याची पुण्यातील ही काही पहिली घटना नव्हती. गेल्यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील रावेत किवळे परिसरात लोखंडी होर्डिंग कोसळून पाच नागरींकांचा बळी गेला होता. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात जोरदार कारवाई केली होती. ज्यामध्ये १२०० हुन अधिक अनधिकृत होर्डिंग्स जमीनदोस्त केल्या होत्या. आता पुन्हा एकदा होर्डिंगमुळे अपघात झाल्याने होर्डिंग्सचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आजमितीला मुंबई, ठाणे, पुणे, पनवेलसारख्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रस्त्यालगत मोठमोठ्या होर्डिंग्स पाहायला मिळतात. प्रमुख रस्त्यांवर उभारलेल्या बहुतांश होर्डिंग्स या लोखंडी सांगाडा तयार करून उभ्या केलेल्या असतात. अशा होर्डिंग्स कोसळल्यावर नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. उन्हाळा आणि पावसाळा या दरम्यान अधूनमधून सोसाट्याचा वारा सुटतो अशा वेळी या होर्डिंग्स पडण्याच्या घडतात. रस्त्यालगत उभारल्या जाणाऱ्या या लोखंडी होर्डिंग्सचे वेळच्या वेळी स्ट्रक्चरल ऑडिट होणे महत्वाचे आहे. शहरांतील या होर्डिंग्सचे स्टक्चरल ऑडिट वेळच्या वेळी होते का ? याकडे पालिका प्रशासन लक्ष देते का हे पाहणेही महत्वाचे आहे. पुण्यात घडलेल्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अवकाळी पाऊस, वादळी वारा यासारख्या स्थिती कुठे आणि केव्हा निर्माण होतील याची काहीच शक्यता वर्तवता येत नाही. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरांतील महापालिकेसह संबंधित विभागाने रस्त्यालगतचे होर्डिंग्स, मोबाईल टॉवर यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले आहे का याची या दिवसांत युद्ध पातळीवर पडताळणी करावी.