उन्हाळ्यात पशु-पक्षांची काळजी घ्या !

0
गेल्या ३०-४० वर्षांत विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. नैसर्गिक जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले तयार होऊ लागली.  मोठमोठी शहरे विकसित होत गेली. नैसर्गिक संपत्तीवर जीवन असलेल्या प्राणिमात्रांचे, पशुपक्षांचे जीवन मात्र यामुळे धोक्यात येऊ लागले. लोकवस्त्या निर्माण करण्यासाठी मानवाने जंगलांवर अतिक्रमण केले, डोंगर नद्या कह्यात घेतल्या. बुद्धिमान मनुष्यप्राण्यापुढे आपले काही चालणार नाही म्हणून प्राण्यांनी आपली स्थाने बदलली. गेल्या दहा-बारा वर्षांत देशासह राज्यात नैसर्गिक कोप झाल्यासारखी परिस्थिती उद्भवू लागली आहे. ऋतुचक्रात फेरफार होऊ लागला आहे. अतिवृष्टीनंतर यंदा सर्वांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीवर केलेल्या अतिक्रमणाचेच हे दुष्परिणाम आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उन्हाच्या तडाख्यामुळे आज मनुष्यप्राणी हवालदिल झाला असला, तरी कृत्रिम थंडावा निर्माण करण्यासाठी त्याच्याकडे पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रे यांसारखी आधुनिक साधने आहेत, पशुपक्षांना मात्र सर्वस्वी नैसर्गिक थंडाव्यावर अवलंबून राहावे लागते.
शहरासारख्या ठिकाणी वृक्षतोडीमुळे हा गारवा नष्ट झाला आहे. अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांत, शहरांत येणाऱ्या पक्षांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. उष्माघातामुळे नवीमुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात प्रतिदिन १०० हुन अधिक प्राणी-पक्षी घायाळ होत आहेत तर रोज १५ ते २० पक्षांचा आणि प्राण्यांचा मृत्यू होत आहे. अन्य शहरांतही काहीशी अशीच स्थिती आहे. अन्न-पाण्याच्या शोधात प्रखर उन्हातून फिरताना हे पक्षी चक्कर येऊन जमिनीवर कोसळतात ज्यामुळे त्यांच्या पंखांना आणि पायांना इजा होते. अशा जखमी अवस्थेत कोसळलेल्या पक्षांवर कुत्रे मांजरी हल्ला करतात त्यामळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडते. वटवाघूळ, माकडे, खार, कोकिळा, पोपट, घार, कावळे, चिमण्या यांसारखे पशु पक्षी प्रतिदिन घायाळ होऊन रस्त्यांवर पडत आहेत. पशु पक्षांवर ही जी काही प्रतिकूल परिस्थिती ओढवली आहे त्याला सर्वस्वी मानव जबाबदार असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून उष्णतेने हवालदिल झालेल्या या पशु पक्षांसाठी प्रत्येकाने काहीनाकाही करायला हवे. आपल्या घराच्या खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये पक्षांना सहज उपलब्ध होईल असे धान्य, खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करा तसेच ते पाणी नियमितपणे बदला.

 

काही पक्षीमित्र संघटना या दिवसांत पशुपक्षांसाठी ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे आणि खाद्याची व्यवस्था करत आहेत. अपुऱ्या निधीमुळे यांना त्यांच्या कार्यात मर्यादा येत आहेत अशा संघटनांशी संपर्क साधून त्यांना सहकार्य करा ! रस्त्यावर कुठे घायाळ अवस्थेतील पक्षी किंवा प्राणी दिसून आला,तर त्याला त्वरित वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करा. एरव्ही प्राणिसंग्रहालयांत आनंदाने बागडणारे पशु पक्षी आपणा सर्वांनाच आवडतात. प्राणिसंग्रहालयातील पशु पक्षांना व्यवस्थापनाकडून नियमितपणे पाणी आणि खाद्य पुरवले जाते मात्र बाहेर स्वच्छंदपणे वावरणाऱ्या पशु पक्षांना आपल्या आणि आपल्या पिल्लांच्या अन्न आणि पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागते. आज त्यांच्यावर उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना दिलेला अल्पसा आधारही त्यांचे जीवन वाचवू शकतो त्यामुळे ही संधी आपण सोडता कामा नये !
Rate Card
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई 
संपर्क : ९६६४५५९७८०

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.