‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवणारा भक्तशिरोमणी हनुमान !

0
2
‘एकदा हनुमानाची निस्सीम भक्ती पाहून प्रभु श्रीरामाने हनुमानाला वर मागण्यास सांगितले. ‘जो कुणी प्रभु श्रीरामाचे स्मरण करत असेल, त्याचे संरक्षण हनुमंत करील आणि कुणीही त्या व्यक्तीचे अहित करू शकणार नाही’, असा वर हनुमानाने मागितला. प्रभु श्रीरामाने ‘तथाऽस्तु’ म्हटले. त्रेतायुगात प्रभु श्रीराम अयोध्येचे राज्य करत असतांना काशीनरेश सौभद्रच्या मनात रामभेटीची मनीषा जागृत झाली. त्याच वेळी महर्षि विश्‍वामित्र यांच्याही मनात प्रभु श्रीरामाला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. दोघेही अयोध्येच्या दिशेने निघाले. वाटेत एका शिव मंदिरात दोघांची भेट झाली. विश्‍वामित्रांचे शिष्य शिवाच्या मंदिरात विश्‍वामित्रांचा जयजयकार करत होते. ‘शिवाच्या मंदिरात केवळ शिवाचाच जयघोष झाला पाहिजे, अन्य कुणाचाही जयजयकार केला, तर शिवाचा अपमान होतो’, असे सौभद्र राजाला वाटले आणि त्याने विश्‍वामित्रांच्या जयजयकाराला विरोध केला. त्यामुळे महर्षि विश्‍वामित्र त्याच्यावर कोपले आणि त्यांच्यात वाद झाला. दोघेही जेव्हा अयोध्येत पोचले, तेव्हा त्यांना एकाच वेळी प्रभु श्रीरामाचे दर्शन झाले. महर्षि विश्‍वामित्रांनी प्रभु श्रीरामाला काशीनरेशाला कठोर शिक्षा करण्याची आज्ञा केली.

 

प्रभु श्रीरामाने दुसर्‍या दिवशी न्यायसभेत वरील प्रसंगाचा न्यायनिवाडा करणार असल्याचे घोषित केले. ‘प्रभु श्रीराम महर्षि विश्‍वामित्रांच्या सांगण्यावरून आपल्याला कठोर दंडित करतील’, या विचाराने सौभद्र भयग्रस्त झाला. इतक्यात तेथे नारदमुनी प्रगट झाले आणि त्यांनी सौभद्राला हनुमंताची माता अंजनीदेवीला शरण जाण्यास सांगितले. नारदमुनींच्या सांगण्यावरून सौभद्र सुमेरूला गेला आणि त्याने अंजनीमातेचे चरण धरले. अंजनीमातेने त्याची स्थिती जाणून घेतल्यावर त्याचे रक्षण करण्याचे अभय वचन दिले. तिने हनुमंताला काशीनरेशाचे रक्षण करण्याचे दायित्व सोपवले. हनुमानाने ते स्वीकारले आणि तो दुसर्‍या दिवशी सौभद्राला सोबत घेऊन पवन वेगाने अयोध्येला येऊन पोचला. त्याने सौभद्रराजाला निर्भय होऊन शरयू नदीच्या किनारी अखंड रामनामाचे स्मरण करत रहाण्यास सांगितले. सौभद्रराजाने अचानक पलायन केल्याची वार्ता दुसर्‍या दिवशी महर्षि विश्‍वामित्रांना समजल्यावर ते अधिकच कोपित झाले. त्यांनी श्रीरामाला सौभद्राचा वध करण्याची आज्ञा केली.
त्याप्रमाणे प्रभु श्रीरामाने सूर्यास्त होण्यापूर्वी सौभद्राचा वध करण्याचा पण केला. प्रभु श्रीरामाचे सैनिक सौभद्राला सर्वत्र शोधत होते. त्यांनी तो शरयू नदीच्या किनारी हनुमंतासह रामनामात मग्न असल्याची सूचना महर्षि विश्‍वामित्र आणि श्रीराम यांना दिली. महर्षि विश्‍वामित्रांसह प्रभु श्रीराम धनुष्य बाण घेऊन शरयू किनारी आले. त्याने पाहिले की, हनुमान पुढे बसलेला आहे आणि त्याच्या मागे सौभद्र राजा बसलेला आहे. दोघेही रामनामाचा अखंड जप करत आहेत. प्रभु श्रीरामाने हनुमानाला बाजूला होण्यास सांगितले, तेव्हा हनुमानाने श्रीरामाला त्यांनी पूर्वी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. महर्षि विश्‍वामित्रांनी सौभद्रावर बाण चालवण्याचा आग्रह केला. प्रभु श्रीरामाला कळेना, ‘हनुमानाला दिलेले वरदान खरे करावे कि विश्‍वामित्रांच्या सांगण्यावरून केलेला पण पूर्ण करावा ?’ अखेर गुरुस्थानी असणार्‍या महर्षि विश्‍वामित्रांच्या आज्ञेवरून प्रभु श्रीरामाने सौभद्रावर बाण सोडला. हनुमानाच्या कृपेमुळे सौभद्राभोवती रामनामाचे संरक्षण निर्माण झाले होते. त्यामुळे प्रभु श्रीरामाचा बाण सौभद्राला लागला नाही.

 

प्रभु श्रीरामाने अनेक बाण सोडले; परंतु एकही बाण सौभद्राला लागला नाही. ‘रामबाण विफल होत आहेत’, हा चमत्कार पाहून महर्षि विश्‍वामित्र थक्क झाले. त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला आणि त्यांच्या लक्षात आले की, भगवंताला स्वत:च्या वचनापेक्षा भक्ताला दिलेले वरदान पूर्ण होणे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे त्यांनी श्रीरामाला पण मागे घेण्यास सांगितले. हनुमानाने काशीनरेश सौभद्राला महर्षि विश्‍वामित्रांचे चरण धरून क्षमा मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे सौभद्रने महर्षि विश्‍वामित्रांची क्षमा मागितली आणि महर्षि विश्‍वामित्रांनी त्याला क्षमा केले. अशा प्रकारे हनुमानाने प्रभु श्रीरामाला धर्मसंकटातून सोडवले आणि सौभद्र राजाचे रक्षणही केले. वरदान आणि पण यांच्या युद्धात वरदानाचा विजय झाला. जर एखादा रामनामाचा जप करत असेल आणि साक्षात् प्रभु श्रीरामाने त्यावर बाण चालवला, तरी त्याचे काहीही अहित होत नाही, हे या प्रसंगातून दिसून येते. भक्तशिरोमणी हनुमानाने ‘रामसे बडा रामका नाम’ ही म्हण सार्थ ठरवली.’
(साभार : सनातन डॉट ऑर्ग)
 
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई 
संपर्क : ९६६४५५९७८०
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here