सांगली : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (SVEEP) अंतर्गत मतदार जनजागृती करिता निमंत्रित टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रत्येक तालुकास्तरावरील तालुका क्रीडा संकुलामध्ये दिनांक २४ व २५ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता रोलर स्केटींग खेळाडूंची रॅली पुष्कराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून काढण्यात येणार असून सांगली जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
दिनांक ०७ मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता सांगली जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक, युवती व सर्व मतदान करण्यास पात्र असणारे नागरिक यांनी मतदानाचा हक्क बजावण्याच्या हेतूने संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या निमंत्रित टेनिस क्रिकेट स्पर्धेत १८ ते ४० वयोगटातील युवक व युवती यांनी आपला संघ नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
स्पर्धेचा सहभाग व नियमावलीबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली तसेच सर्व तालुक्यातील सहाय्यक नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. सहभागी संघांची नोंद स्पर्धेपूर्वी २ दिवस अगोदर करण्यात यावी. अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत पवार (मो.नं. ९४०३९६८६२५) या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.