गुरुकुल शिक्षण पद्धती’…. काळाची गरज !  

0
15

जून महिना सुरु झाला कि पालकांना वेध लागतात ते आपल्या मुलांना चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळवून देण्याचे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचा निभाव लागावा, पाल्याला चांगले शिक्षण मिळावे त्याचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना परिसरातील सर्वोत्तम शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. शाळांना द्यावी लागणारी देणगी, शाळेची प्रवेश फी, वार्षिक फी, शाळेच्या बसची फी या सर्वांसाठी आवश्यक धनाची जमवजमाव करण्यासाठी विविध मार्गाने पैसे जमवण्यास सुरुवात केली जाते. हल्ली काही शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशाआधी पालकांची परीक्षा घेतली जाते, त्याचीही तयारी पालकांना वेगळी करावी लागते. शाळेसोबत परिसरातील नामांकित कोचिंग क्लासमध्ये पाल्यांना घालण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न वेगळेच. 

           
गेल्या काही वर्षांत वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा अभ्यास केल्यास समाजची नैतिकता कमालीची घसरत चालल्याचे लक्षात येईल. अपहरण, खून, बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना पुष्कळ प्रमाणात वाढल्या आहेत. ६ महिन्याच्या बालिकेपासून ८० वर्षाची वृद्धाही वासनांधांच्या दुष्कर्मांना बळी पडू लागल्या आहेत. नातेवाईक, पोलीस, शिक्षक, डॉक्टर यांसारख्यांवर काही वर्षांपूर्वी डोळे झाकून विश्वास ठेवला जात असे अशा व्यक्तीही आज स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये गुन्हेगार म्हणून समोर येऊ लागल्या आहेत. शालेय मुलांच्या दफ्तरांमध्ये सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या आणि गुटखा तंबाखूच्या पुड्या सापडू लागल्या आहेत. मित्रमंडळींमध्ये संवाद साधताना शिव्या आणि अश्लील शब्दांचा वापर करत एकमेकांच्या आईवडिलांचा उद्धार करणे तरुणवर्गासह शालेय मुलांमध्येही  नित्याचे होऊ लागले आहे ज्यामध्ये आता मुलीसुद्धा मागे नाहीत. बालगुन्हेगारीचे प्रमाणही दिवसागणिक वाढू लागले आहे. हल्लीचे वेब सिरीज, हिंदी चित्रपट यांतून दाखवली जाणारी अश्लील आणि कामुक दृश्ये पौगंडावस्थेतच मुला-मुलींतील कामवासना जागृत करण्यास कारणीभूत ठरत आहेत. शालेय जीवनापासून मुलांच्या हाती स्मार्ट फोन आल्याने आणि त्यावर अल्प दरात इंटरनेट मिळू लागल्याने त्यावर ऑनलाईन गेम्स खेळण्यासोबत मुले पॉर्न फिल्म पाहण्यात बराच वेळ व्यतीत करत असल्याचे एका सर्वेक्षणांतून समोर आले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडणारी तरुणाई विवाहापूर्वीच शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागली आहेत.
शहरासारख्या ठिकाणी लग्नापूर्वी मुलामुलींची १-२ प्रेमप्रकरणे असणे आता साधारण मानले जाऊ लागले आहे. लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या पाश्चिमात्य विकृतीन्ना येथे कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी त्याचे भयंकर दुष्परिणाम सुद्धा समोर येऊ लागले आहेत. शाळेतून घरी आल्यावर किंवा सुटीच्या दिवसांत मित्रांसोबत मैदानी खेळ खेळण्याऐवजी घरी पालकांच्या मोबाइल्सवर, टीव्हीवर गेम्स खेळणे, रिल्स पाहणे हल्लीच्या शाळकरी मुलांना अधिक आवडू लागले आहे. या सर्वांतून त्यांच्या डोळ्यासह मानसीक आरोग्यावरही परिणाम होऊ लागले आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त शहरासारख्या ठिकाणी स्थायिक झालेल्या कुटुंबात जेष्ठ कोणी नसल्याने आणि आईबाबा दोघेही नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याने अशा मुलांवर धार्मिक संस्कार होतच नाहीत. आपल्या स्वार्थासाठी समाजाला त्रास देणे, इतरांना लुबाडणे लोकांना हल्ली चुकीचे वाटत नाही, संपत्तीच्या लोभापायी आईवडिलांचा, भावंडांचा जीव घेतला जात आहे, सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनू लागला आहे.
प्राचीन भारतीय संस्कृती, आपले धर्मग्रंथ, वेद-उपनिषिदे ही संस्कारांची कोठारे आहेत; मात्र आज ती शाळा महाविद्यालयांतून शिकवली जात नाहीत. देश स्वतंत्र होऊन आज ७६ हुन अधिक वर्षे उलटूनही इंग्रजांनी भारतीयांवर लादलेली शिक्षणपद्धती भारतीयांनी झिडकारलेली नाही, त्यामुळे भारतीयांना व्यवहारज्ञान देणारी ही शिक्षणपद्धती भारतीयांत संस्कार, नीती आणि नैतिक मूल्य रुजवण्यात असमर्थ ठरत आहे. इंग्रज भारतात येण्याच्या आधीपासून भारतातील लोक नीतिवान आणि सुसंस्कारी  होते. त्यांना शिक्षण देणारे गुरुकुल गावागावांत होते, अशी नोंद तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी केली आहे. गुरुकुल शिक्षणपद्धती ही वैदिक काळापासून चालत आलेली समृद्ध शिक्षण पद्धती आहे. गुरुकुलात राहून विद्यार्थी सर्वांगीण शिक्षण घेत असत. गुरुकुलात घडलेला विद्यार्थी हा सर्वांगाने आदर्श असाच असे. त्यामुळे सुसंस्कृतता हे भारताचे तत्कालीन प्रमुख वैशिष्ट्य होते. आपल्या प्रत्येकावर देव, ऋषी, पितर आणि समाज अशी चार ऋणे असतात आणि ती आपल्या जीवनकाळात फेडावीत असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. गुरूकुलातून तयार होणारा प्रत्येक विद्यार्थी ही ऋणे फेडण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याच्यातील नीतिमत्ता अबाधित राहते.  इंग्रजांनी हीच मेख ओळखून गुरुकुल पद्धतीवर घाला घातला आणि मॅकॉलेप्रणित शिक्षण व्यवस्था भारतात रुजवली.
गेल्या काही वर्षांत भारतातील अनेक राज्यांत गुरुकुल निर्माण होऊ लागले आहेत. ज्यामध्ये मुलांची जात पाहून नव्हे तर आवड पाहून प्रवेश दिला जातो. या गुरुकुलांतून मुलांना रामायण, महाभारत आदी ग्रंथांसोबत वेद, वेदांग, उपनिषिदे, पुराण यांची शिकवण दिली जाते. मुलांना पहाटे लवकर उठून व्यायामाची सवय लावली जाते. विविध स्तोत्रे, मंत्र, अभंग त्यांच्याकडून मुखोद्गत करून घेतले जातात. स्वावलंबनाचे धडे दिले जातात, संपूर्ण अध्ययन काळात अठरा विद्या, चौसष्ट कला शिकवल्या जातात. गोपालनाचे आणि गोसंवर्धनाचे महत्व बिंबवून सकल प्राणिमात्राचे जीवन समृद्ध आणि सुसह्य करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते. हल्ली गुरुकुलांतून स्थानिक शिक्षण विभागानुसार शालेय अभ्यासक्रमही शिकवला  जातो. शाळेप्रमाणेच या ठिकाणी दोन घटक चाचण्यासह सहामाही आणि वार्षिक परीक्षा घेतली जाते. अनेक गुरुकुलांतून पदवी अभ्यासक्रमासह पदव्युत्तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणही दिले जाते. अनेक डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स गुरुकुलातून शिक्षण घेऊन समाजाच्या सेवेसाठी बाहेर पडू लागले आहेत. वैदिक शिक्षणासोबत व्यावहारिक शिक्षणही या ठिकाणी दिले जात असल्याने गुरुकुलात सिद्ध होणारी प्रत्येक व्यक्ती ही नीतिमान, धैर्यवान आणि व्यवहारकुशलही बनते. निसर्गाच्या सानिध्यात वसणारे हे गुरुकुल मुलांना चांगल्या आरोग्यासह कुशल व्यक्तिमत्वही बहाल करते. समाजाच्या ढासळत्या नीतिमत्तेवर समाजात गुरुकुल शिक्षणपद्धतीचे महत्व रुजवणे आणि मुलांना गुरुकुलात घालणे हा एक उत्तम पर्याय आहे. साधू संतांची आणि महात्म्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने गुरुकुलांची संख्या फारच अल्प आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गुरुकुल आहेत अशा ठिकाणी पालकांना फार लांबून आपल्या मुलांना घेऊन यावे लागते. काही नवीन गुरुकुल राज्यात निर्माण होऊ लागले आहेत. गुरुकुल ही निवासी शिक्षणपद्धती असून तिची व्याप्तीही प्रचंड मोठी आहे, त्यामुळे गुरुकुल उभारण्यासाठी शाळा महाविद्यालय उभे करण्यापेक्षा अधिक व्यय येतो. बहुतांश गुरुकुल हे शाळा महाविद्यालयाप्रमाणे डोनेशन्स घेत नाहीत, मुलांच्या राहण्यासाठी आणि त्याच्या शालेय वस्तूंसाठी आवश्यक तेव्हढीच रक्कम पालकांकडून घेतली जाते.
काही गुरुकुल तर मुलांना पूर्णतः मोफत प्रवेश देऊन त्यांच्या राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्चही पालकांकडून घेत नाहीत. गुरुकुलांना विविध उपक्रम राबवण्यासाठी, गुरुकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासासह त्यांच्या सोयीसुविधेसाठी प्रतिदिन मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. त्यामुळे ज्यांना आपल्या पाल्यांना व्यावहारिक शिक्षणासोबत नैतिक मूल्यांचे आणि धार्मिक संस्कारांचे शिक्षण द्यायचे आहे अशांनी आपल्या पाल्यांना गुरुकुलात घालावे. भारतीय संस्कृतीचे, संस्कारांचे ऊर्जास्रोत असलेले गुरुकुल अधिकाधिक समृद्ध व्हावेत, गुरुकुलात शिक्षण घेणाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी गुरुकुलांना अर्थसाहाय्य करावे. चांगल्या शाळेत शिक्षण घेऊनही मुलांमध्ये नीतिमत्ता, मोठ्यांचा आदर करणे, इतरांची काळजी घेणे, आईवडिलांचा सांभाळ करणे यांसाखे गुण अंगी येतीलच असे नाही हे लक्षात आल्याने मुलांना गुरुकुलांत घालणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. येणाऱ्या काळात समाजात गुरुकुलांचे महत्व अधिक प्रमाणात वाढणार आहे, यासाठी खरेतर सरकारने शासकीय खर्चातून गुरुकुल उभारायला हवेत; मात्र सरकार या बाबतीत अनुकूल नसल्याने ज्या संस्था, संघटना, व्यक्ती गुरुकुल उभारत आणि चालवत आहेत त्यांचे बळ वाढवण्याचे दायित्व आपलेच आहे. आज गुरुकुल उभारणीसाठी आपण केलेले साहाय्य येणाऱ्या पिढीचे पर्यायाने भारतीय संस्कृतीचे भवितव्य घडवणार आहे.

जगन घाणेकरघाटकोपरमुंबई 

 

संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here