तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळेचे सुपुत्र प्रमोद नलवडे यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. सध्या ते सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आता पदोन्नतीवर ते पुणे येथे सीआयडीला गेले आहेत. त्यांच्या पदोन्नतीमुळे वायफळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वायफळे येथील प्रमोद नलवडे यांची 2010 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती. गेली 14 वर्षे ते महाराष्ट्र पोलीस दलात अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावत आहेत. वायफळे येथील खंडेराया व्यायाम संस्थेचे ते खेळाडू आहेत. कबड्डी व क्रिकेट या खेळामध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले होते.
पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी नाशिक व मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर त्यांनी पुणे व सोलापूर या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले.
दरम्यान सुमारे 14 वर्षे पोलीस दलात कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची आता पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. सोलापूर येथून त्यांची पुणे सीआयडी येथे पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे वायफळेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.