यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यात तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदा खासदार बनले आणि त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. सहकार खात्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री म्हणून अमित शाह यांच्याकडे आहे. त्यात मोहोळ यांच्यावर या खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मोठ्या प्रमाणात असून विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं मोठं वर्चस्व आहे. त्यामुळे मोहोळ यांना भाजपाकडून ही मोठी जबाबदारी मिळाल्याचं दिसून येते.
महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्याचसोबत रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळालेली खाती
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
प्रतापराव जाधव – केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रामदास आठवले – केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
रक्षा खडसे – केंद्रीय राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मुरलीधर मोहोळ – केंद्रीय राज्यमंत्री सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय
दरम्यान, एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात एकूण कॅबिनेट मंत्र्यांपैकी २५ भाजपाचे आणि ५ इतर घटक पक्षांचे आहेत. तर स्वतंत्र प्रभार असणारे ५ राज्यमंत्री आहेत. ज्यात ३ भाजपा, जयंत चौधरी यांच्या रुपाने एक आरएलडी आणि प्रतापराव जाधव यांच्या रुपाने एक शिवसेना यांचा समावेश आहे.