अमोल डफळे विधानसभेच्या आखाड्यात विधानसभा लढण्याची तयारी सुरू | नोकरीचा राजीनामा देणार 

0
जत : सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच जत तालुक्यात विधानसभेचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन अप्रत्यक्ष बरेच काही घडले. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सोशल मीडिया व व्यासपीठाच्या पडद्यामागून काँग्रेस मंडळींनी लक्ष्य केल्याने जयंत पाटील समर्थक नाराज झाले आहेत. योग्य वेळी उत्तर देवू, असा इशारा जयंत पाटील समर्थकांकडून दिला जात असतानाच जत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात माजी मंत्री जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले, उमराणीचे सुपुत्र व सध्या जत येथेच सहाय्यक निबंधक पदावर कार्यरत असणारे अमोल डफळे यांनी जत विधानसभा निवडणूक लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
अमोल डफळेही लवकरच आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देवून जत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. जयंत पाटील यांनीही त्यांना जतच्या जागेसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी जत विधानसभा निवडणुकीसाठी डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसले आहेत. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर, अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. त्यात अमोल डफळे यांचे नावही विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्याच्या यादीत आल्याने जतच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमोल डफळे यांनी स्वतः गाठीभेटी घेण्यावर एका बाजूला भर दिलेला असताना दुसऱ्या बाजूला डफळे समर्थकांनी व जयंतप्रेमींनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी दिसत असली तरी महाविकास आघाडीतून ही जागा राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेत अमोल डफळे यांना उमेदवारी मिळते का याची चाचपणी सुरू असतानाच जो पक्ष अमोल डफळे यांना उमेदवारी देईल त्यांच्या चिन्हावर अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून जतची निवडणूक लढवायचीच असा चंग समर्थकांनी बांधत समर्थक कामाला लागले आहे.
Rate Card
संस्थानिक डफळे घराण्याचे वलय
जतच्या डफळे घराण्याला जिल्ह्यात व तालुक्यात मोठा राजकीय वारसा आहे हे सर्वश्रुत आहे. स्व.अनिलराजे डफळे यांच्यानंतर डफळे घराण्यातील कोणीही फारसे सक्रिय झाले नाहीत.स्व.अनिलराजे यांचे सुपुत्र शार्दूलराजे डफळे यांनाही राजकारणात फारसे स्वारस्य नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले भविष्य आजमाविण्यासाठी डफळे घराण्यातील उमराणीचे सुपुत्र अमोल डफळे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
अभ्यासू, अनभुवी,प्रशासनातील मोठा अभ्यास
बिळूर जिल्हा परिषद गटातील उमराणीचे असलेले अमोल डफळे यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. ते काम पाहताना त्यांनी विशेष करून संपूर्ण जत तालुक्यावरच लक्ष केंद्रीत केले होते. जयंतरावांची जतमध्ये राष्ट्रवादी वाढीमध्ये व जतला मिळालेल्या सहा टीएमसी पाण्यासह विविध विकास कामात अमोल डफळे यांचा वाटा मोठा आहे. डफळे जत विधानसभा निवडणूक रिंगणात उतरल्यास जतचे राजकीय समीकरणे बदलणार हे नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.