जत : वारणा व कोयना क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी जत तालुक्यात सोडून तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी युवा नेते अमोल डफळे यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, सांगलीचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांच्याकडे केली आहे.सध्या कोयना, वारणा, कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस पडत आहे. नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून महापूर येण्याची शक्यता आहे.मात्र जत तालुक्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पुराचे पाणी जत तालुक्यामध्ये सोडावे.
राज्याचे माजी मंत्री आ. जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना पुराचे वाहून जाणारे पाणी जत, कवठेमहांकाळसह दुष्काळी तालुक्यात सोडले होते. त्यामुळे पुढे अनेक दिवस या तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास मदत झाली होती त्याच धर्तीवर कार्यवाही करावी, अशी मागणी अमोल डफळे यांनी केली आहे. उमदी व बिळूर भागात प्राधान्याने हे पाणी सोडू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्याचे डफळे यांनी सांगितले.