जत : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर म्हैसाळचे तीन पंप सुरू करून जत तालुक्यातील तलाव भरण्यासाठी महापुराचे हे पाणी जतला वळविण्यात आले खरे पण अद्यापही म्हैसाळ कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे मायथळपर्यंत हे पाणी पोहोचलेच नाही ही वस्तुस्थिती आहे. महापुराचे पाणी जे जतला सोडले ते गेले कुठे असा सवाल उपस्थित करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी जतला पाणी सोडा अन्यथा कोरडया तलावात बैठे आंदोलन करण्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
तुकाराम बाबा महाराज म्हणाले, सांगली, कोल्हापूरमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. महापूरांचे पाणी इतरत्र वाहून जाण्यापेक्षा हे पाणी जतला सोडावे अशी मागणी झाल्यानंतर जतसाठी म्हैसाळचे तीन पंप सुरू करण्यात आले. या तिन्ही पंपातून पाणी तालुक्यात पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले पण प्रत्यक्षात ज्या गतीने पाणी सोडून तालुक्यातील ज्या तलावात म्हैसाळचे पाणी जाणे शक्य आहे त्या तलावात पाणी सोडण्यात आलेले आलेले नाही.
तालुक्यातील जत पूर्व भागात अद्यापही पावसाचे प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्याने या भागामध्ये टँकर सुरू आहेत, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे असे असताना जत पूर्व भागात हे पाणी अद्याप सोडण्यात आलेले नाही. महापुराचे पाणी सर्वप्रथम म्हैसाळचे शेवटचे टोक असलेल्या मायथळ येथे सोडून त्यानंतर तिथून माडग्याळ, उटगी येथील दोडण्णाला तलाव, उमदी भागातील तलावात पाणी सोडणे आवश्यक आहे पण प्रशासनाने तसे केलेले नाही. जिथे गरज आहे तिथे पाणी सोडण्यात आली नाही. सध्या कृष्णा, वारणेत मुबलक पाणीसाठा आहे तेव्हा प्रशासनाने त्यातील पाणी जत पूर्व भागातील व अन्य भागातील तलावात सोडावे अन्यथा तलावात बसून आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला आहे.