संख : चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून जत विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी लवकरच तुकाराम बाबांना शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यानंतर पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून तुकाराम बाबा यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे उबाठाचे जतचे नेते अमित उर्फ बंटी दुधाळ, सागर
पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सागर पाटील, रमेश कदम, अशोक शिंदे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाने काय केले हे सर्वांना माहित आहे.त्यांच्या चुकीच्या वागण्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे सांगत अमित दुधाळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जरी आमचा पराभव झाला असला तरी जत तालुक्यात आजी-माजी आमदार एका बाजूला असतानाही अपेक्षित यश त्यांना तेथील मतदारांनी मिळू दिले नाही.
त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मताधिक्य त्यांना मिळवले ही वस्तुस्थिती आहे. जतचा भूमिपुत्र व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे नेतृत्व आगामी विधानसभा निवडणुकीत उतरावे अशी आमची इच्छा आहे जतची जागा उबाठाकडे द्यावी, या मागणीसाठी लवकरच जतचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे.
सागर पाटील म्हणाले, तुकाराम बाबांचे अध्यात्माबरोबरच सामाजिक कार्यातले योगदान मोठे आहे. कोरोना, महापूर, दुष्काळ, म्हैसाळच्या पाण्यासाठीचा त्यांचा सुरु असलेला लढा यामुळे तुकाराम बाबा हेच योग्य उमेदवार आहेत. आमच्या पक्षातून त्यांनी उभा राहावे यासाठी लवकरच आम्ही त्यांची भेट घेवून त्यांना विनंती करणार आहोत तसेच ही जागा महाविकास आघाडीतून उबाठाकडे द्यावी यासाठी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना साकडे घालण्यासाठी शिष्टमंडळ भेटणार असल्याचे सांगितले.