महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रकमेचे वाटप

0

 

Rate Card

पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्र, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी, 4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.