वायफळेतील चिमुरड्यावर झाली मोफत शस्त्रक्रिया | मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत : मंगेश चिवटे ठरले ‌‘देवदूत’

0
5
तासगाव : तालुक्यातील वायफळे येथील यश सुनिल नलवडे या दोन वर्षीय चिमुरड्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय सहाय्यता निधीतून या शस्त्रक्रियेचा खर्च करण्यात आला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे याकामी नलवडे कुटुंबियांसाठी ‌‘देवदूत’ ठरले आहेत.
   
वायफळे येथील यश नलवडे याच्या आई – वडीलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना रोजंदारीने कामाला जावे लागते. यशचे वडील सुनिल हे गावातील एका गवंड्याच्या हाताखाली कामाला जातात. तर आई पियांका ही घरगुती कामं करुन आपल्या कुटुंबाची गुजराण करते. दोन वर्षांपूर्वी नलवडे दांपत्याला हसता – खेळता मुलगा झाला. मात्र तो सातत्याने आजारी पडत होता. त्याला श्वसनाचा त्रास होत होता.
काही दिवसांपूर्वी त्याची सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या श्वासनलिकेच्या तोंडाला मांसाच्या गाठी तयार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला श्वास घेताना त्रास होत होता. धाप लागत होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यासाठीचा खर्च लाख रुपयांच्या घरात होता.
शस्त्रक्रियेचा खर्च ऐकून नलवडे कुटुंबिय भांबावून गेले. इतके पैसे कुठून आणायचे, असा सवाल त्यांना भेडसावत होता. एखाद्या शासकीय योजनेतून अथवा कोणाकडून मदत घेऊन शस्त्रक्रिया होते का, यासाठी कुटुंबाने प्रयत्न केले. मात्र कुठेच त्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे कुठूनतरी कर्ज काढून आपल्या चिमुरड्याची शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन त्यांनी केले. मात्र हातावरचे पोट असल्याने त्यांना कर्जही उपलब्ध होत नव्हते. कर्ज मिळाले तरी ते फेडायचे कसे, असाही सवाल त्यांच्या समोर होता.
अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधला. या कक्षाचे तासगाव तालुका प्रमुख सचिन शेटे यांच्या माध्यमातून अमोल पाटील यांना घरच्या हालाखीच्या परिस्थितीबद्दल सांगितले. यानंतर अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना यश नलवडे याच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली. चिवटे यांनी तातडीने या चिमुरड्याच्या शस्त्रक्रियेबद्दल यंत्रणा हलवली.
दरम्यान, यश नलवडे याला सांगली येथील मेहता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी व्हिडोओ कॉलद्वारे मंगेश चिवटे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांना धीर दिला. शिवाय पैशाची काळजी करू नये. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून यश याच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च केला जाईल. आणखी पैसे लागले तरी खास बाब म्हणून मुख्यंमत्र्यांची स्वाक्षरी घेऊन पैसे देऊ. मात्र पैशाअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही, अशी ग्वाही दिली.
यश याच्यावर चार दिवसांपूर्वी मेहता हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाली. डॉ. अजित मेहता, यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांना डॉ. पृथ्वीराज पाटील, तृप्ती पाटील यांनी सहकार्य केले. त्याला काल (सोमवार) डिस्चार्जही करण्यात आले. एक रुपयाही न घेता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शस्त्रक्रिया झाल्याने नलवडे कुटुबियांच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्र्यांप्रती सद्भावना दिसून येत होती.
या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अमोल पाटील, तासगाव तालुका प्रमुख सचिन शेटे, सूरज शेख, नरेश पाटील, अजित कांबळे, स्वरुप काकडे, जितेश देशमुख, रविंद्र ननावरे, रोहित वायभिसे, दीपाली चव्हाण यांनी मोलाचे प्रयत्न केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय सहाय्यता निधीतून आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. गोरगरीब, कष्टकरी लोकांवर मोफत उपचार झाल्याने सामान्य लोकांचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here