तासगाव (अमोल पाटील): येथील दत्त माळावर राष्ट्रवादी पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी आयोजित केलेल्या कृषिहित या कृषी प्रदर्शनास गालबोट लागले आहे. प्रदर्शन पहायला गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची सुरक्षा रक्षकाने छेड काढली. यानंतर युवकांनी संबंधित सुरक्षा रक्षकास चांगलेच तुडवले. नंतर पोलिसांनीही या सुरक्षा रक्षकास चोप दिला.
याबाबत माहिती अशी : राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त येथील दत्त माळावर युवा नेते रोहित पाटील यांनी कृषिहित हे कृषी प्रदर्शन भरवले आहे. 16 ऑगस्ट पासून हे प्रदर्शन सुरू झाले आहे. आज (मंगळवार) या कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्याचे नूतन खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले होते.
दरम्यान, काल (सोमवार) तासगाव येथील दोन अल्पवयीन विद्यार्थिनी हे प्रदर्शन पहायला गेल्या. प्रदर्शन पाहत असताना त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाने या विद्यार्थिनींकडे वाईट नजरेने पाहिले. त्यानंतर हा सुरक्षा रक्षक आपल्या एका मित्राला म्हणाला, मला ‘ती’ मुलगी आवडत आहे. पण, तिला विचारायचे माझे धाडस नाही. त्यावर तो मित्र म्हणाला, तू विचारायचे राहूदे. मी विचारतो. त्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाचा मित्र ‘त्या’ अल्पवयीन विद्यार्थिनीजवळ गेला. तिला म्हणाला, ‘तो सुरक्षा रक्षक तुला लाईक करतोय, त्याला हो म्हण.’
संबंधित विद्यार्थिनीने हा सगळा प्रकार काल रात्री आपल्या घरी भावाला सांगितला. हा प्रकार ऐकून संतप्त झालेल्या तरुणांनी आज (मंगळवार) कृषी प्रदर्शनाकडे धाव घेतली. संबंधित सुरक्षा रक्षकाला शोधून काढून त्याला चांगलाच चोप दिला. त्याने स्वतःची चूक मान्य केली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ‘त्या’ सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणले. तर त्याचा मित्र ज्याने संबंधित विद्यार्थिनीला विचारले होते त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक व त्याच्या मित्राला पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला. दोघांनाही चांगलाच चोप दिला. दरम्यान, कृषी प्रदर्शनात सुरक्षा रक्षक, बाऊन्सर हे महिला, विद्यार्थिनीच्या रक्षणासाठी असतात. त्यातीलच एका सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याने कृषी प्रदर्शनास गालबोट लागले आहे.