मुंबईतील बैठकीत सकारात्मक चर्चा
जत : मंत्रालय, मुंबई येथे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात जत तालुक्याच्या पाणी प्रश्नावर महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.अनेक दिवसांपासून जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा करण्याची मागणी विधानसभेत सातत्याने करत होतो. या पार्श्वभूमीवर,आज या विषयावर तातडीने बैठक बोलावण्यात आली होती,अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.
या बैठकीत २९ गावांसाठी मंजूर असलेली प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यावर चर्चा करण्यात आली. त्याऐवजी, या गावांसाठी स्वतंत्र “जलजीवन मिशन” अंतर्गत नळ पाणी योजना सुरु करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव, जलजीवन मिशन महाराष्ट्र राज्याचे मिशन संचालक, मुख्य अभियंता, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.