गोपाळकाला अगदी तोंडावर आल्याने लाखांची बक्षिसे लावण्यात आलेल्या हंड्यांचे फ्लेक्स ठिकठिकाणी पाहायला मिळू लागले आहेत. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. कालपरत्वे या प्रथेचे व्यावसायिकरण झाले आणि ठिकठिकाणी लाखांची बक्षिसे मिळवून देणाऱ्या हंड्या बांधल्या जाऊ लागल्या. आता नवरात्रीप्रमाणे दहिहंडी उत्सवही राजकारणी आणि धनदांडग्यांची मक्तेदारी झाली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंड्या इच्छुक उमेदवारांसाठी प्रचाराचे मोठे साधन ठरणार आहेत. त्यामुळे दहीहंडी पथकाकांडून यंदा भरघोस कमाई केली जाणार हे निश्चित आहे. दहीहंडीच्या व्यासपीठावरून राजकीय फटाके फुटण्याची शक्यताही यंदा नाकारता येत नाही.
जो अधिक रकमेची बक्षिसे लावेल त्याच्या दहीहंडीला मोठ्या प्रमाणात गर्दी तर दिसतेच शिवाय वृत्तवाहिन्या, लोकल केबल नेटवर्कवाले अशा ठिकाणी पहाटेपासून दबा धरून बसलेली पाहायला मिळतात. लोकांनी अधिक गर्दी करावी यासाठी याठिकाणी सेलिब्रिटीजनाही अतिथी म्हणून बोलावले जाते. त्यांच्याकडून नृत्य करवून घेतले जाते, चित्रपटातील संवाद म्हणण्यास सांगितले जाते. काही तरुण मंडळी तर खास या सेलिब्रिटी मंडळींना पाहण्यासाठी गर्दी करतात. गोविंदा पथक येतात, मनोरे रचतात, मोठे साहस करून अगदी वरच्या थराला पोहोचलेली किशोरवयीन मुले जमलेल्या जमावाला अभिवादन करतात; मात्र खास सेलिब्रिटींना पाहण्यासाठी आलेल्या मंडळींचे या गोविंदा पथकांकडे लक्षही नसते. वृत्तवाहिन्या, केबल नेटवर्क यांचे कॅमेरेसुद्धा केवळ सेलिब्रिटींभोवतीच घुटमळत असतात. दहिहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून मागील वर्षांपासून मुंबईत प्रो कबड्डीच्या धरतीवर प्रो दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. अर्थात याठिकाणी दहीहंडीच नसल्याने दहीहंडीच्या नावावर ती मानवी मनोऱ्यांची स्पर्धाच असले असेच म्हणावे लागेल. दहीहंडी उत्सवाच्या दिवशीही पुन्हा हेच चित्र पाहायला मिळते. ज्या ठिकाणी दहीहंडीचा इव्हेन्ट बनवला जातो त्या ठिकाणी दहीहंडी केवळ नावाला उभी केलेली असते.
अधिकाधिक थर लावा आणि तेव्हढ्या थरांसाठी नियोजित केलेली रक्कम घेऊन जा हा एकच कार्यक्रम याठिकाणी राबवला जातो. त्यामुळे याला उत्सव म्हणावे कि साहसी खेळाची प्रात्यक्षिके हाही एक प्रश्नच आहे. राज्यसरकारने गोविंदा पथकांना १० लाखांचे विमाकवच देऊन या मनोऱ्याच्या स्पर्धेला जणू प्रोत्साहनच दिले आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत त्यामुळे दहीहंडीही यातून सुटलेली नाही. मुंबईत महिला गोविंदा पथकांची संख्याही वर्षागणिक वाढू लागली आहे. ज्या ठिकाणी महिला गोविंदा पथक हंडी फोडण्यास येतात अशा ठिकाणी बघ्यांची गर्दी जरा जास्तच झालेली पाहायला मिळते. यामध्ये आंबट शौकीनही असतात. श्रीकृष्णाने बालगोपाळांसह हंड्या फोडून लोणी खाल्ल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे; मात्र गोपिकांनी त्याकाळी असे काही केलेले नाही, त्यामुळे दहीहंडी उत्सवाकडे धार्मिक उत्सव म्हणून पाहायचे असेल, तर किमान महिलांच्या हंडीची तरी या उत्सवामध्ये गणना करू नका.
श्रीकृष्णाचे सवंगडी विविध वर्णातील तर होतेच शिवाय त्यातील अनेक जण खूपच गरीब होते. आपल्या सवंगड्यासह आपलीही शिदोरी एकत्र करून सारे भेद नष्ट करून एकत्र येण्याचा मोलाचा संदेश श्रीकृष्णाने गोपाळकाल्याच्या माध्यमातून दिला आहे. आज हिंदू धर्मामध्ये जातीपातीच्या नावाखाली, राजकीय पक्षभेदामुळे आणि वैचारिक भेदांमुळे विविध गट निर्माण झाले आहेत. आज जाहिराती, सिनेमा, वेब सीरिजच्या माध्यमांतून केले जाणारे देव-देवतांचे, महापुरुषांचे, इतिहासाचे विकृतीकरण याचे आपल्याला काहीच वाटत नाही. कोणीही उठते आणि हिंदूंच्या धार्मिक प्रथा परंपरांना अंधश्रद्धा म्हणून हिणवते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आपणच आपल्या महान संस्कृतीला विसरून परकीय संस्कृतीला जवळ करू लागलो आहोत. परिणामी आपलीच अपरिमित हानी होत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार यंदा आपापसातील सारे मतभेद विसरून राष्ट्राच्या आणि धर्माच्या पुनरुत्थानासाठी एकत्र येण्याचा संकल्प करूया आणि खऱ्या अर्थाने गोपाळकाला साजरा करूया !
– जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
संपर्क क्रमांक : ९६६४५५९७८०