संख : कर्नाटकातील तुबची – बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागात दाखल झाले आहे. कर्नाटक तिकोंडी क्रमांक : १ लघु पाटबंधारे तलाव या पाण्याने ओसंडून वाहू लागला आहे.आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाण्यासाठी पाठपुरावा केला होता. तिकोंडी तलावातून हे पाणी ओढा पात्रातून भिवर्गी साठवण तलावात दाखल झाले आहे. हा तलाव भरल्याने द्राक्षे, डाळिंब या फळबागांना याचा फायदा होणार आहे. शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या तालुक्यात ४२ गावे व त्याखालील वाड्यावस्तीना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी पूर्व भागातील कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या यत्नाळ तलावात सोडले आहे. भिवर्गी साठवण तलावाची साठवण क्षमता ३२५.०० द. ल. घ. फू आहे. या योजनेने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. भिवर्गी साठवण तलावाखाली संख, अक्कळवाडी, भिवर्गी, कॉतवबोबलाद या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या विहिरी आहेत. त्यामुळे पाणीप्रश्नही सुटणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सध्याचे कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील यांची भेट घेऊन पाणी मिळावे, अशी मागणी केली होती.
तुबची बबलेश्वरचे कार्यकारी अभियंता प्रवीण हुन्सीकट्टी, अभियंता अंबण्णा हरळय्या, शिवशरण करडी, नडगड्डी, विस्तारित म्हैसाळचे अभियंता रोहित कोरे, बाबार्सा पाटील, रवींद माळी, आप्पाराया बिरादार, पीरू माळी, बाबासाहेब कोडग, शिवानंद तेली, अनिल पाटील यांनी पाण्याची पाहणी केली.