तासगाव : तालुक्यतील पेड घाटात शिक्षिकेवर चोरट्यांनी चाकूहल्ला केल्याची घटना, हा त्या शिक्षिकेने केलेला बनाव असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी संबंधित शिक्षिका हर्षदा ज्ञानेश्वर भोईटे (रा. हातनूर) हिने तासगाव पोलिसात तशी कबुली दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली. हर्षदा भोईटे हिने शनिवारी सकाळी पेड घाटात माझ्यावर चोरट्यांनी चाकूहल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली होती.दोन चोरटे एका महिलेवर चाकूहल्ला करतात. महिला तो चाकूचा वार आपल्या डाव्या हाताने झेलते, दुसऱ्या हाताने पर्समधील स्प्रे काढून चोरट्यावर फवारणी करते आणि चोरटे पळून जातात, असे शिक्षिकेने सांगितल्यानंतर, हा तिचा बनाव असू शकतो, अशी पोलिसांना शंका आली.
पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, हर्षदा ही पेड येथील एका हार्डवेअर दुकानात गेली असल्याचे दिसून आले. हर्षदा हिने त्या दुकानदाराकडे पहिल्यांदा कटर मागितला. तिला कटर पसंत पडला नाही. तिने मोठा धारदार चाकू आहे का? अशी दुकानदाराकडे मागणी केली. दुकानदाराने पन्नास रुपये किमतीचा चाकू हर्षदा हिला दाखविला. तिने तो चाकू तळहातावर उलट सुलट फिरवून तपासून घेतला.
दुकानातून चाकू खरेदी करून हर्षदा ही आपल्या दुचाकीवरून पेडहून हातनूरच्या दिशेने आल्यानंतर तिने त्या ठिकाणी थांबून खरेदी केलेल्या चाकूने आपल्या डाव्या हातावर वार करून जखम करून घेतली. ही घटना तिचा पती ज्ञानेश्वर यांना फोन करून सांगितली या घटनेची माहिती काही वेळातच समाजमाध्यमातून सर्वत्र होताच खळबळ माजली होती. मात्र काही तासातच पोलिस निरीक्षक वाघ आणि त्यांच्या पथकाने हा बनाव असल्याचे निष्पन्न करून ह बनवाबनवी उघडकीस आणली.