थकीत कर्जदारांना सवलत,नियमित कर्जदारांना धतुरा
जत : जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्जदार सभासदांना ऑटीएस योजनेच्या माध्यमातून सवलत दिली जाते.मात्र नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना मात्र धतुरा दिल्याची भावना शेतकरी सभासदांच्यामध्ये निर्माण झाली असून त्याचा वसुलीवर परिणाम होत असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना जिल्हा बँकेने प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी जिल्हा बँकेकडे केली आहे.
राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना 50 हजार चे गाजर दाखवले.पण प्रत्यक्षात कोणताही लाभ दिला नाही.त्यामुळे निदान जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःच्या नफ्यातून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना प्रोत्साहन अनुदान देऊन बँक शेतकऱ्यांची असल्याचे कृतीतून सिद्ध करावे असे आवाहन विक्रम ढोणे यांनी केलं.
राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करेल या आशेने अनेक शेतकरी थकबाकीदार झाले आहेत.त्याचा बँकेच्या वसुलीवर परिणाम होत आहे.त्यामुळे प्रोत्साहन अनुदान योजना बँकेने सुरू करावी.तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने सोसायटी मार्फत कर्ज वाटप करताना आणि विविध योजना राबविताना योजनेच्या पात्रतेच्या निकषांचे पालन करून कर्ज वाटप करावे.तोंड पाहून मध्यम मुदत,दीर्घ मुदत कर्ज पुरवठा करू नये. सरसकट सर्वांना एकमताने कर्ज पुरवठा करावा अशी मागणी विक्रम ढोणे यांनी केली.
ओटीएस योजनेमुळे सेवा सोसायटी तोट्यात
जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना राबवून सेवा सोसायटीला अडचणीत आणले आहे.बँक दरवर्षी सोसायटी कडून कर्जावरील व्याज वसूल करते.मात्र ओटिएस योजनेमध्ये कर्जावरील व्याजाला सवलत दिली जाते.पण त्याचा प्रत्यक्षात तोटा सेवा सोसायटीला सहन करावा लागत असल्याने सर्व सेवा सोसायटी तोट्यात चालल्या आहेत.