एलकेपी मल्टिस्टेटचा 280 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पुर्ण | चेअरमन अनिल इंगवले यांची माहिती | वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

0
27

सांगोला : सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोला आणि सूर्योदय महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी त्याचबरोबर एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या तीनही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा सांगोला शहरातील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली.

 

 

यावेळी मंचावर एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे , एलकेपी मल्टीस्टेट चे व्हा.चेअरमन सुभाष दिघे, सूर्योदय अर्बनचे चेअरमन जगन्नाथ भगत, महिला अर्बनच्या चेअरमन पूजा इंगवले, मेडशिंगी चे सरपंच प्रतापसिंह इंगवले, ऑडिटर उमा उंटवाले, माजी प्राचार्य बजरंग लिगाडे , सेवानिवृत्त शिक्षक तांबोळी गुरुजी, तिन्ही संस्थांचे सचिव तसेच सूर्योदय परिवाराचे संचालक प्रशांत पाटील, नारायण घाडगे, सुभाष अनुसे, महेश नश्टे, संतोष घाडगे , सुभाष आलदर, समाधान घाडगे त्याचबरोबर कर्जदार आणि ठेवीदार सभासद बंधू-भगिनींची या सर्वसाधारण सभेसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सुरुवातीला प्रस्ताविकामध्ये संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी या संस्थांच्या वाटचालीबद्दल सखोल माहिती सांगितली.

 

सांगोला शहर आणि तालुक्यातील छोटे मोठे व्यावसायिक तसेच पशुपालक असलेल्या सभासदांच्या हिताचा विचार करत सुरुवातीपासून उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या सूर्योदय अर्बन या संस्थेची ही सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा असून सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच लघु उद्योगांना चालना देण्यासाठी सतत अग्रेसर असलेली सूर्योदय महिला अर्बन या संस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत असताना सर्व कर्मचारी वृंदांच्या कुशल व सेवाभावी वृत्तीमुळे आणि ठेवीदार,सभासद व ग्राहकांच्या अनमोल सहकार्यामुळे संस्थेचे स्वभांडवल आणि नफ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचेही इंगवले यांनी प्रास्ताविकामध्ये नमूद केले. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून कार्यरत असलेली एलकेपी मल्टीस्टेट ही संस्था देखील उल्लेखनीय नफा मिळवत ठेवीदारांसाठी आकर्षक व्याजदर व अनेक प्रकारच्या कर्ज प्रकारांसह एनइएफटी व आरटीजीएस सह अनेक प्रकारच्या ऑनलाइन बँकिंग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून या संस्थेने बँकिंग सेक्टर मध्ये गौरवाचे स्थान प्राप्त केलेले आहे.

 

या संस्थांनी आतापर्यंत सुमारे 280 कोटींचा व्यवसाय केल्याबद्दल समाधान व्यक्त करत येत्या मार्च अखेरपर्यंत सर्व ग्राहकांच्या साथीने सुमारे 425 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचेही यावेळी संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी सांगितले. यावेळी सूर्योदय महिला अर्बनचे सचिव अण्णासाहेब इंगवले यांनी सविस्तर अहवाल वाचन केले. तर रेशमा कमले यांनी सूर्योदय अर्बन या संस्थेचे अहवाल वाचन केले.

 

यावेळी या संस्थेच्या सभासदांना 10% इतका लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच रुपये अडीच हजार पेक्षा जास्त शेअर्स असणाऱ्या सभासदांसाठी दीपावली निमित्त भेटवस्तू म्हणून पाच किलो साखर देण्याचेही जाहीर करण्यात आले. त्यानंतर एल के पी मल्टीस्टेटचे सीईओ राजकुमार बहिरे यांनी सविस्तरपणे संस्थेचे अहवाल वाचन केले. मल्टीस्टेटच्या सभासदांसाठी यावर्षी तब्बल 11 टक्के इतका लाभांश जाहीर करण्यात आला. या संस्थांच्या प्रगतीसाठी ज्यांचे अनमोल सहकार्य लाभले अशा ग्राहकांचा यथोचित सन्मान देखील यावेळी करण्यात आला.

 

पहिल्या फेरीतच नामवंत मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन प्राप्त केल्याबद्दल यशश्री अनिल इंगवले यांचा आणि पशुधन पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल विशाल लेंडवे यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी प्राचार्य बजरंग लिगाडे, प्रा.आबा इंगवले तसेच दत्तात्रय भाकरे इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याबद्दल विशेष कौतुक केले.

 

 

सूर्योदय अर्बन चे चेअरमन जगन्नाथ भगत यांनी सूर्योदय परिवाराच्या आजवरच्या कार्याचा धावता आढावा घेत पुढील ध्येय धोरणे स्पष्ट केली. तसेच सर्व सभासद बंधूंनी आपला अडीच हजार रुपयांचा शेअर्स पूर्ण करावा असे आवाहन यावेळी करत सर्व उपस्थितांचे आभार मानले . शेवटी स्नेहभोजने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बन तसेच एल के पी मल्टीस्टेटच्या कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here