बस्स, आता खूप झाले, यापुढे कोणताही सुसंस्कृत समाज महिलांवर असे अत्याचार होऊ देणार नाही. समाजाला ‘प्रामाणिक, निःपक्षपाती आत्मनिरीक्षणाची’ आणि स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची गरज आहे. समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. निर्भयाच्या घटनेनंतर आपल्याला सामूहिक स्मृतिभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसते. ही घटना अतिशय वेदनादायक आणि भयावह आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे.
देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बंगालमध्ये भाजपाने सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय इतरही राज्यातून अशाच प्रकारच्या घटना पुढे आल्या आहेत. या घटनांनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. देशभरात संतापाची लाट उसळली आहे.