सांगोला : पतीने पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून लोखंडी पाईप डोक्यात पाठीमागे जोरात वार करून ५५ वर्षीय इसमाचा गजेंद्र शिंदे खून केला. ही घटना मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७:३० सुमारास शिरभावी (ता. सांगोला) येथील फॉरेस्ट रोडवर घडली. गजेंद्र विश्वनाथ शिंदे (वय ५५, रा.खिलारवाडी, ता. सांगोला) असे खूनझालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर किसन इंगोले (रा. खिलारवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी सागर इंगोले यास बुधवारी पंढरपूर (इसभावी) येथून कारसह ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, खिलारवाडी येथील आरोपी सागर इंगोले यांच्या राहात्या घरापासून हाकेच्या अंतरावर गजेंद्र शिंदे हे शेतात राहण्यास आहे. पत्नीसोबत संबंध असल्याच्या कारणावरुन आरोपी हा चिडून होता. याच कारणावरून मंगळवार, दि. २७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास आरोपीने गजेंद्र यांच्या मुलाला आज मी तुझ्या वडिलांना ठार करणार असल्याचे बोलून पांढ-या रंगाच्या कारमध्ये बसवून गेला. दरम्यान, वाटेत महूदकडून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना बायकोला दवाखान्यात नेण्याचे निमित्त करून बसवून दिला. गजेंद्र यांच्या दुचाकीला कार आडवी लावून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले व तेथून कार गादेगाव,वाखरी, कराड रोड या भागात वेगाने फिरवली.
तिसंगी गावातून शिरभावी (ता. सांगोला) गावातील जाणाऱ्या फॉरेस्टमध्ये सायंकाळी ७:१५ च्या सुमारास आणून उभी केली व गजेंद्र यांना आपण दोघेच चर्चा करू म्हणून खाली उतरवले. त्यावेळी आरोपीने कारमधील पाईप काढून लघुशंकेला गेला. तीन-चार वेळा पाइप डोक्यात घातल्याने गजेंद्र हे रक्तदाताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पवनकुमार मोरे करीत आहेत.