दाम्पत्यापैकी पत्नीचा मृतदेह सापडला | एनडीआरएफची आत्तापर्यंत २२ तास शोध मोहिम

0
32

तासगाव : जुना सातारा रस्त्यावरील तुरची हद्दीतील येरळा नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहून गेलेल्या दाम्पत्यापैकी पत्नीचा शोध तिसऱ्या दिवशी लागला. मात्र पतीचा शोध लागलेला नाही. हे दाम्पत्य सातारा जिल्हयातील आहे. तर रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम करून गावी परतत असतानाच काळाने मुलगी व जावई यांच्यावर काळाने घाला घातला आहे. हे दाम्पत्य बेपत्ता असल्याची नोंद तासगांव पोलिसात असून बुधवारी मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर एनडीआरएफ टीमची आत्तापर्यंत सुमारे २२ तास शोध मोहित राहिली आहे.
२० तासांच्या शोध मोहिमेनंतर पत्नीचा मृतदेह सापडला. मंगळवारी सकाळी ८ च्या दरम्यान पुन्हा एनडीआरएफ टीमने दोन बोटीच्या साह्याने तांदळे वस्ती पूल ते निमणी येथील येरळा नदी पूल या सुमारे साडे तीन कि.मी मध्ये सायंकाळी ६.३० पर्यंत शोध मोहिम सुरू होती. सोमवारी व मंगळवारी शोध घेतल्यानंतरही शोध लागला ‌नाही बुधवारी २० तासानंतर पत्नीचा मृत्तदेह आढळून आला आहे.
तासगावातील भिलवडी नाका येथील विकास गोविंद माने यांनी मंगळवारी तासगांव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, माझे साडू दत्तात्रय उत्तम पवार-५० व मेव्हुणी सौ. रेखा दत्तात्रय पवार-४७ (रा. पिंपवडी बुद्रुक ता. कोरेगांव जि. सातारा) हे २४ ऑगस्ट रोजी सासु इंदुबाई बबन फडतरे (रा. वरचे गल्ली, तासगांव) या मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधी करीता आले होते.२६ रोजी रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आवरून दुपारी २.१५ च्या दरम्यान ते गावाकडे जाण्यासाठी गेले. ते रात्री उशीरा पर्यंत गावी न पोहचल्याने तसेच पलूस, कराड, येथील नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर ही शोध न लागल्याने ते कोठेतरी बेपत्ता झाले असावेत असे नमूद आहे.
सौ. रेखा पवार यांच्या आईचे निधन झाल्याने त्या पतींसमवेत अंत्यविधीसाठी आल्या होत्या. रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम करून आपल्या गावी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे..
आजही शोध सुरू राहणार…
तांदळेवस्ती येथील पुलावर तसेच निमणी येरळा पुलावर वाहून गेलेल्या दाम्पत्याचे कुटुंबिय तसेच नातेवाईक थांबून होते. सर्वांच्याच नजरा शोध घेणाऱ्या एनडीआरएफ टीमकडे लागून होत्या. पण बुधवारी उशीरापर्यंत दत्तात्रय पवार यांचा शोध लागला नाही. त्यामुळे गुरूवारीही शोध मोहिम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here