खेळताना गळफास बसून बालिकेचा मृत्यू

0
8

सांगली : येथील सिव्हिल हॉस्पिटल जवळील सावंत प्लॉटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील अंजली नितीन खांडेकर (वय ६, रा. पहिली गल्ली, सावंत प्लॉट) या चिमुरडीचा खेळता खेळता कापडी बेल्टने गळफास बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना?, अशा शक्यतेने पोलिसांनी दीड तास चौकशी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन खांडेकर हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षाचा मुलगा आहे.

अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. वडील नितीन हे गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई,छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते. दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती. थोड्या वेळाने आई बाहेर आली तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले, अंजलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चिमुकल्या अंजलीचा संशयास्पद मृत्यू तर नाही ना?, अशी चर्चा परिसरात होती.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here