तपासाचे आव्हान : आई-बाबांसह नातेवाइकांना जीवाला घोर
सोलापूर : घरातील किरकोळ कारण असो किंवा प्रेम प्रकरणासह अन्य कारणाने घरातून मुली व महिला गायब होण्याचे प्रमाण वाढत आहे. गायब होण्यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. नेमक्या पोरी गेल्या कोठे? असा प्रश्न संबंधित नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण सात पोलिस ठाणे आहेत. आठवड्यातून किमान एक ते दोन महिला किंवा मुली गायब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात होत असून, त्याचा तपास केला जात आहे. ज्या मुली किंवा महिला संपर्कात येतात त्यांचा तपास करून पोलिस त्यांना घेऊन येतात व संबंधित आई-वडिलांच्या ताब्यात देतात. मात्र, ज्यांचा कसलाच संपर्क होत नाही, अशा महिलांचा मात्र शोध लागत नाही.
कॉलेज, ट्युशन, मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून मुली बाहेर जातात. महिलाही वेगवेगळी कारणे सांगून बाहेर पडतात त्या पुन्हा येत नाहीत.यामध्ये अल्पवयीन मुलींचेही प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकारामुळे संबंधित आई-वडील व नातेवाइकांची चिंता वाढत चालली आहे. मुलगी मिळत नाही तोपर्यंत ती कुठे असेल? कार करत असेल? तिचे काय बरे-वाईट तर झाले नसेल ना? अशा अनेक प्रश्नांनी त्यांची झोप उडते.
सात महिन्यांत ३०४ महिला गायब
जानेवारी २०२४ ते जुलै २०२४ दरम्यान शहरातील एकूण ३०४ मुली व महिला गायब झाल्या आहेत. पोलिसात तक्रार केल्यानंतर सुमारे २०० मुली व महिला यांना परत आणण्यात यश मिळाले आहे. मात्र, बाकींच्या महिला कुठे आहेत? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
■ सात महिन्यांत ६२ अल्पवयीन मुली गायब झाल्या होत्या. त्यापैकी ४५ मुली या मिळून आल्या आहेत. १७ मुली या अद्याप बेपत्ता आहेत.