नागपूर: राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे. याकरिता अर्ज करण्याचा अवधीदेखील वाढवण्यात आला आहे. पुणे येथे प्रथम टण्याच्या कार्यक्रमात एक कोटी ६० लाख लाडक्या बहिणींच्या खात्यांत ३२२५ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. शनिवारी दुसऱ्या टप्प्यात नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात महायुती सरकारने ५२ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यांत १५६२ कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यांचे अर्ज मंजूर झाले नसतील त्यांनी चिंता करू नये, सर्व पात्र लाभाथ्यर्थ्यांना सरकार लाभ देणार आहे. विरोधकांनी या योजनेला विरोध केला आहे.
मात्र, महायुती सरकार आपल्या लाडक्या बहिणींना हा लाभ देण्यास कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या तिन्ही भावांची ताकद वाढवा, लाडक्या बहिणींच्या ओवाळणीच्या रकमेत निश्चितच वाढ करून देऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यांत पैसे जमा करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून नवी आश्वासकता व विश्वास राज्यातील बहिणींना मिळाला आहे. या योजनेला राज्यातील महिलांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन या योजनेच्या जोडीला आणखी काय देता येईल, याचा प्रयत्न शासन करत आहे. राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. महिला विकसित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत विकसित होणार नाही, हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी सर्व पातळ्यांवर मदत करून परिवर्तन घडवले जाईल.
इतिहास बदलण्याची शक्ती महिलांमध्ये असते, हे लक्षात घेऊन त्यांच्या जीवनात विविध योजनांच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांच्या सन्मानाची जोपासना केली जाईल, अशी हमी देतानाच नागपूरच्या विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचीही फडणवीस यांनी माहिती दिली.
तीन कोटी लाडक्या बहिणींना देणार लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अडीच कोटी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असले तरी ही संख्या तीन कोटीपर्यंत घेऊन जाण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारच्या तिजोरीतील पैसे हे सर्वसामान्यांचे असल्याने त्यांना याचा लाभ मिळालाच पाहिजे. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो, म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या योजनेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत. विरोधकांनी केतीही प्रयत्न केले, न्यायालयात गेले तरीही योजना बंद होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘लाडक्या बहिणीं’ना दिला. लाडक्या बहिणींना दिली जाणारी ही रक्कम ‘माहेरचा अहेर’ आहे.महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास फक्त १५०० रुपये नाही तर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपयांपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. ही योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात बोलताना, अत्याचाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी, असा आमचा प्रयत्न राहणार आहे, गुन्हेगाराला माफी मिळणार नसल्याचा शब्दही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.
महिला कल्याणाच्या योजनांसाठी ७५ हजार कोटी अजित पवार
या योजनेसंदर्भात विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला आता उत्तर मिळाले असून तिच्या अंमलबजावणी संदर्भात पसरवण्यात आलेली नकारात्मकता अनाठायी असल्याचे सिद्ध झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. ही योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी असून योजना भविष्यातही कायमस्वरूपी राबवण्यात येणार आहे.
या योजनेसोबतच सिलिंडर वाटप, मोफत शिक्षण अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकार त्यासाठी ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करत आहे. महिलांना सबळ, सक्षम, सन्मानित आणि सुरक्षित करण्याचे काम राज्यातील विद्यमान सरकारकडून करण्यात येत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सजग आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केले.