मोर्शी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरू असलेली ‘जन सन्मान यात्रा’ आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.नगर परिषद विद्या मंदिर शाळेच्या मैदानावर शेतकरी, महिला आणि तरुणांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी आपल्या पार्श्वभूमीबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, “राजकारणात येण्यापूर्वी मी शेतात खूप मेहनत केली आहे. मी गायी आणि म्हशींचे दूध काढलं आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये अंडी गोळा केली आहेत. मी मनानं शेतकरीच आहे. शेती समजून न घेता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणारे अनेक आहेत. शेतकरी ते उपमुख्यमंत्री होण्यापर्यंतचा माझा प्रवास हा माझ्या समर्पणाचा पुरावा आहे.” लोकांशी असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करताना अजित पवार म्हणाले, “मला सत्तेची भूक नाही. जर आपण लोकांची सेवा करू शकत नसलो तर आपल्या पदाचा काय फायदा? लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हे पद आहे. याचा उपयोग मानवतेच्या उन्नतीसाठी केला पाहिजे.”
मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, गेल्या ५ वर्षांत आमदार देवेंद्र भुयार यांनी ४ हजार ३७२ कोटी रुपये निधी मतदारसंघात आणला आहे. जो कोणत्याही नेत्याने या मतदारसंघात आणलेला सर्वाधिक निधी आहे. स्थानीक विकासकामांबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकारने विदर्भ ॲग्रो-व्हिजन उत्पादक कंपनीसाठी आधुनिक संत्र प्रक्रिया प्रकल्पासाठी निधी दिला आहे. उमरखेडमध्ये प्रशासकीय इमारती आणि प्रयोगशाळांसाठी १ कोटीच्या निधीतून सिट्रस पार्क उभारण्यात आले आहे. सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वरुडमध्ये एमआयडीसीची स्थापना करण्यात येणार आहे. शहराच्या मध्यभागी शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले यांचे पुतळे बसविण्याच्या देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. लोकांना त्यांच्या शिकवणीनुसार, आदर्शांवर जगण्याची प्रेरणा मिळावी यासाठी मोर्शी येथे शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुले यांचे पुतळे बसवले असून या पुतळ्यांच्या अनावरणाची अधिकृत घोषणा केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, कोणी चूक केली असेल तर त्यांना कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साम्राज्य हे ‘भोसलेंचे राज्य’ नव्हे तर ‘लोकराज्य’ म्हणून ओळखले जात होते. शिवाजी महाराजांसारखा राज्यकर्ता कधीच होणार नाही. आम्ही माफी मागितली आहे, पण आमचे विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत आहेत.”
महत्वाकांक्षी माझी लाडकी बहिन योजनेचा राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांना लाभ झाला आहे. या राज्यव्यापी यात्रेदरम्यान अजित पवार महिलांना भेटून संवाद साधताना दिसत आहेत. या कार्यक्रमात हजारो महिलांनी पवारांना राख्या बांधल्या. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, “मी महिलांच्या निःस्वार्थ भावनेने प्रभावीत झालो आहे. विशेषतः, समाजाच्या भल्यासाठी महिला स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात. महिलांचे नुकसान करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिलांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि हीच महायुतीची भूमिका आहे.
अजित पवार यांनी वरुडच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाबद्दलही आपलं मत व्यक्त केलं आहे. प्राचीन मंदिरं आणि वास्तुकलेसाठी वरुड ओळखले जाते. त्याचबरोबर स्वातंत्र्यलढ्यात येथील अनेकांनी योगदान दिलं आहे. याला ‘नागपूरची ऑरेंज सिटी’ असंही म्हटल्या जातं.’ अजित पवार यांनी वरुड येथील संत्रा फार्मलाही भेट दिली. अजित पवार महिला व बाल रुग्णालयासाठी दिलेल्या जागेचाही आढावा घेणार आहेत.
प्रफुल्ल पटेल यांनी तत्पूर्वी आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांचं मतदारसंघातील विकासकामांबद्द्ल अभिनंदन केलं. दिल्लीत भुयार यांच्याशी झालेल्या त्यांच्या भेटीचा संदर्भ देताना पटेल म्हणाले, “जेव्हा भुयार दिल्लीत आले, तेव्हा त्यांनी माझ्याशी आणि अजित पवार यांच्याशी संत्र्यांची निर्यात, चांगला भाव मिळवून देण्यासाठी विचारणा केली, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.” त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राज्यातील ‘भगिनींना’ खऱ्या अर्थाने कोणी मोलाची भेट दिली असेल तर माझी लाडकी बहीण योजनेतून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारे अजित पवार आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आल्याबद्दलचं कारण सांगताना ते म्हणाले की, “त्यांच्यासारखा कोणीही नेता नाही, जो कामाला प्राधान्य देतो”. विरोधकांवर तोंडसुख घेत ते म्हणाले की आमचे विरोधक ‘संधीसाधू’ आहेत आणि त्यांच्या या वागण्यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. याबद्दल आम्ही उदासीन आहोत.”