पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वादातून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. याप्रकरणी आंदेकर यांची बहीण, मेहुणा, भाच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, त्यांचा जावई जयंत कोमकर (वय ५२),गणेश कोमकर यांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, भाचा प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संजीवनी कोमकर ही वनराज यांची बहीण आहे. नाना पेठेतील दुकानावर अतिक्रमण कारवाई केल्याने आरोपी कोमकर चिडले होते.