पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. दि. ६ ते दि. १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव कुलाळ यांनी दिली.
दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे तर व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने भरायचे आहेत.
अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे गरजेचे अर्जात भरलेली माहितीची पडताळणी करून ती अचूक असल्याची खात्री शाळांनी करावी.
विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रीलिस्ट ४ डिसेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करायच्या असल्याचे स्पष्ट केले आहे.