माळवाडी (ता. पलूस) येथील ट्रान्स्फॉर्मर शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका जागेवरून दुसऱ्या जागी अनधिकृतपणे स्थलांतरित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी आवाज उठवल्यानंतर महावितरणकडून पाहणी करण्यात आली. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता यांनी पत्रात म्हटले आहे.
मनसेने तक्रारीत म्हटले आहे की, तासगाव तालुक्यातील संबंधित ठेकेदार हा समर्थ इलेक्ट्रिकल्स नावाने महावितरणमध्ये काम करत आहे. तासगाव महावितरणमधील अनेक कामे याच्या कार्यालयातून होत असतात. यासाठी येथील अधिकारी नागरिकांना संबंधित ठेकेदाराची भेट घेण्यासाठी पाठवत असतात. अशी तक्रार मनसेकडे आली होती. यानंतर माहिती घेतली असता संबंधित ठेकेदार अनेक कामे अनधिकृतरीत्या करून लोकांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले. याशिवाय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने जुने साहित्य वापरून बिले मात्र नवीन साहित्याप्रमाणे काढली आहेत. माळवाडी येथील एक ट्रान्स्फॉर्मर शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
याबाबत मनसेच्या तक्रारीनंतर अधीक्षक अभियंत्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. यावेळी या ठेकेदाराने शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार केल्याचे दिसून आले. यामुळे संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करू, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
संबंधित ठेकेदाराने केलेले काम अनधिकृत आहे. हा ट्रान्स्फॉर्मर हलविण्याबाबत कोणतीही परवानगी या कार्यालयाकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– एस. एस. राठोड (विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, मिरज)