जत : जत तालुक्यातील जाडरबोबलाद ते मारोळी रस्त्याचे काम रखडले होते. आंदोलन केल्यानंतर आश्वासन देवून वर्ष उलटून गेले तरी काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ त्या मार्गावरील रस्त्यावरच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी गुरुवारी वास्तुशांती सोहळा करून सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले होते. या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने काम सुरू केले. आंदोलनस्थळी काम सुरू करण्यासाठी ज्या मशिनरी आल्या होत्या त्याचे पूजन करून तुकाराम बाबा यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ, उमेश मुल्ला, रामलिंग मेडेदार,अमृत पाटील महाराज.काटे महाराज जवळा, तुकाराम जोंधळे, नारायण नरळे, भारत खांडेकर, संतोष चेळेकर, महेश भोसले, सुनील कांबळे,आबा खांडेकर ,मल्लेश हाताळी, आबा खांडेकर, मल्लेशातळे, बसू बिराजदार, गंगास्वामी, सलीम अपराध आदी उपस्थित होते.जाडरबोबलाद ते मारोळी रस्त्याची दुरावस्था झाल्याने सोन्याळ येथे मागील वर्षी नऊ ऑगस्ट रोजी रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले, काम सुरू करण्यासाठी रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर अंथरली पण त्यानंतर कुठे तरी माशी शिंकल्याने हे काम रखडले आहे. काम रखंडल्याने या मार्गावरून जाणाऱ्या पादचारी व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे काम रखडल्याचा निषेध करत तुकाराम बाबा यांनी आंदोलन पुकारले होते.
■ खड्डे मुक्त तालुक्यासाठी लढा उभारणार
आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने काम सुरू केल्याबद्दल तुकाराम बाबा यांनी प्रशासनातील अधिकारी यांच्यासह ठेकेदार किशोर निकम यांचे आभार मानले. तालुक्यातील अनेक रस्त्यात मोठं मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संपूर्ण जत तालुका खड्डेमुक्त झाला पाहिजे यासाठी लढा उभारणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.